श्रीनगर - पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 25 वा 26 फेब्रवारीला जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळी पंतप्रधान जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांची ते भेट घेतील. तसेच प्रदेशातील विकास आणि सुरक्षेचा आढवा मोदी घेणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
प्रदेशातील साडे आठ किलोमीटर लांबीची बनिहाल काजीगुंड हाईवे टनेलचे काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान आपल्या दौऱ्यात या टनलचे उद्घाटन करणार असल्याची माहिती आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये पंतप्रधान मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शनिवारी जम्मू-काश्मीरमधील 'आयुष्मान भारत पंतप्रधान-जन आरोग्य योजनेचं उद्घाटन केलं होतं.
केंद्राने कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीरमध्ये जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका होत आहेत. यामुळे या निवडणुकांना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. गुपकर आघाडी विरुद्ध भाजप अशी मुख्य लढत झाली. या निवडणुकीत भाजपाला चांगले यश मिळाले. सात पक्षांच्या गुपकर आघाडीने 280 जागांपैकी सर्वाधिक 110 जागा जिंकल्या. एकूण 75 जागांवर विजय मिळवत भाजप सर्वांत मोठा पक्ष ठरला. भाजपने जम्मूमध्ये 72 तर काश्मीरमध्ये 3 जागा जिंकल्या होत्या.
काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी युरोपीय संघाचे प्रतिनिधीमंडळ जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर गेले होते. त्यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला होता. राज्यातील परिस्थिती पूर्वपदावर येत असून केंद्राने 4-जी सेवा पूर्ववत केली आहे.
जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन (सुधारणा) विधेयक जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात येणार आहे. जम्मू आणि काश्मीरची नागरी सेवेतील अधिकारी आता अरुणाचल प्रदेश, गोवा, मिझोराम केंद्रीय सेवेतील कॅडरमध्येविलीन होणार आहेत. जम्मू आणि काश्मीर पुनर्गठन (सुधारणा) विधेयक, 2021 मुळे या प्रदेशाच्या प्रशासनाचा चेहरा-मोहरा बदलण्यास मदत होईल.