नवी दिल्ली - कोरोनाच्या लढ्यात महत्त्वाचा टप्पा असलेल्या 18 ते 44 वयोगटासाठी लसीकरण नोंदणी आज सायंकाळी 4 वाजल्यापासून सुरू होत आहे. नागरिकांना कोविन किंवा आरोग्य सेतू अॅपवर नोंदणी करून लसीकरणाची तारीख व वेळ निवडता येणार आहे. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात थेट लसीकरण केंद्रावर जाऊन नागरिकांना लस घेता येणार नाही. त्यामुळे ही नोंदणी महत्त्वाची आहे.
केंद्र सरकारने 1 मेपासून 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरणाची परवानगी दिली आहे. यापूर्वी केवळ ४५ वयोगटापासून पुढे असलेल्या नागरिकांना कोरोनाची लस देण्यात येत होती. कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असताना लसीकरण केंद्रावर गर्दी होऊ नये, याकरिता केंद्र सरकारने लस घेण्याकरता आगाऊ नोंदणी बंधनकारक केली आहे. केंद्र सरकारने 28 एप्रिलपासून लस नोंदणी होणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे 27 एप्रिलच्या मध्यरात्रीनंतरच अनेकांनी लस नोंदणीचा प्रयत्न करूनही अनेकांना ओटीपी मेसेज येत नव्हता. आज सकाळी केंद्र सरकारने लस नोंदणी सायंकाळी 4 नंतर होणार असल्याचे जाहीर केले आहे. नागरिकांना राज्य किंवा संबंधित केंद्रितशासित प्रदेशांमधील ठराविक खासगी रुग्णालय किंवा सरकारी रुग्णालयांमधून लस मिळू शकणार आहे.
हेही वाचा-उच्च शिक्षित शाह कुटुंबीयांनी स्वीकारलं जैन मुनीत्व, सोडली बड्या पगाराची नोकरी
सीरमची कोव्हिशिल्ड लस ही खासगी रुग्णालयांमध्ये 600 रुपयांना तर सरकारी रुग्णालयांमध्ये 600 रुपयांना मिळणार आहे. तर भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन ही सरकारी रुग्णालयांमध्ये 600 रुपये तर खासगी रुग्णालयांमध्ये 1200 रुपयांना मिळणार आहे.
हेही वाचा-18 वर्षावरील लाभार्थ्यांना पैसे घेऊन लस, ही तर मुंबईकरांची फसवणूक - भाजपा
- लस नोंदणीकरता कोव्हिन अॅपची https://selfregistration.cowin.gov.in ही वेबसाइट आहे.
- तसेच आरोग्य सेतू अॅपवरूनही लसीकरण नोंदणीचा पर्याय देण्यात आला आहे.
- नागरिकांना जन्मतारीख असलेले ओळखपत्र नोंदणी केल्यानंतर अपलोड करणे बंधनकारक असणार आहे.
- एकाच ओटीपीवरून चार जणांसाठी लसीकरण नोंदणी करता येते.
- नागरिकांना कोरोना लसीकरणासाठी जवळील केंद्र, तारीख व वेळ निवडता येते.
दरम्यान, महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्रप्रदेश, कर्नाटकसह विविध राज्यांनी सरकारी रुग्णालयांमधून मोफत लस देण्याचे जाहीर केले आहे.