नवी दिल्ली Parliament Attack : लोकसभेच्या प्रेक्षक गॅलरीतून उडी मारून गोंधळ घालणाऱ्या दोन तरुणांबद्दल अधिक माहिती समोर आली आहे. यापैकी एका तरुणाचं नाव सागर शर्मा असून दुसऱ्या तरुणाचं नाव मनोरंजन आहे. हे दोघंही कर्नाटकातील भाजपाचे खासदार प्रताप सिम्हा यांच्या नावानं पास घेऊन लोकसभेचं कामकाज पाहण्यासाठी आले होते. या प्रकरणी खासदार प्रताप सिम्हा यांनी लोकसभा सभापती ओम बिर्ला आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेऊन स्पष्टीकरण दिलं.
कोण आहेत प्रताप सिम्हा : प्रताप सिम्हा कर्नाटकातील म्हैसूर मतदारसंघातून भाजपाच्या तिकीटावर दुसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांचा आणि वादांचा फार पूर्वीचा संबंध आहे. २०१५ मध्ये टिपू सुलतान जयंती सोहळ्याच्यावेळी त्यांनी कर्नाटक सरकारच्या विरोधात आवाज उठवला होता. टिपू सुलतान हा केवळ इस्लामवाद्यांसाठी आदर्श असू शकतो, असं ते म्हणाले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या हे राज्यातील जिहादींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.
बसस्थानक पाडण्याचा इशारा देऊन चर्चेत आले : मूळचे पत्रकार असलेले प्रताप सिम्हा गेल्या वर्षी म्हैसूर-उटी रस्त्यावरील बसस्थानक पाडण्याचा इशारा दिल्यानंतर वादात सापडले होते. बसस्थानकाचं बांधकाम मशिदीप्रमाणे असल्याचा दावा त्यांनी केला होता. "मी सोशल मीडियावर हे बसस्थानक पाहिलं. ते घुमटासारखं आहे. मध्यभागी एक मोठा आणि बाजूंना लहान घुमट आहे. ती एक मशीद आहे. मी अभियंत्यांना तीन-चार दिवसांत बांधकाम पाडण्यास सांगितलंय. त्यांनी तसं केलं नाही तर मी स्वत: जेसीबी नेऊन ते पाडीन", असं सिम्हा म्हणाले होते.
आजच्याच दिवशी संसदेवर हल्ला झाला होता : दिल्ली पोलिसांनी बुधवारी दुपारी संसद भवनाबाहेर पिवळा धूर सोडून घोषणाबाजी केल्याबद्दल दोन जणांना ताब्यात घेतलं. नीलम सिंह (४२) आणि अमोल शिंदे (२५) अशी या दोघांची नावं आहेत. नीलम हरियाणाच्या हिस्सारची रहिवासी असून अमोल लातूरचा आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. उल्लेखनीय म्हणजे, पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबा आणि जैश-ए-मोहम्मद या संघटनांच्या दहशतवाद्यांनी २००१ मध्ये आजच्याच दिवशी संसदेवर हल्ला केला होता. या हल्ल्यात ९ लोक मारले गेले होते.
हे वाचलंत का :