तिरुवनंतपुरम : केरळचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते ओमन चांडी यांच्यावर शुक्रवारी पहाटे कोट्टयममधील पुथुप्पल्ली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पुथुपल्ली येथील सेंट जॉर्ज ऑर्थोडॉक्स चर्चमध्ये खास थडगे करण्यात आले होते. विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री असतानाही ओमन चांडी यांच्या इच्छेप्रमाणे अंत्यसंस्कारावेळी अधिकृत राज्य सन्मान टाळण्यात आला. यावेळी हजारो नागरिकांनी साश्रू नयनांनी आपल्या लाडक्या लोकनेत्याला अखेरचा निरोप दिला.
तिरुवनंतपुरमहून कोट्टायमला पार्थिव पोहोचण्यास लागले 24 तास : केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचे मंगळवारी बंगळुरु येथे घशाच्या दीर्घ आजाराने निधन झाले. ओमन चांडी यांचे पार्थिव बंगळुरुवरुन कोट्टयम येथे नेण्यात आले. यात तिरुवनंतपुरमहून कोट्टायमला पोहोचण्यासाठी 3 ते 4 तास लागतात. मात्र माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचे पार्थिव तिरुवनंतपुरमवरुन कोट्टयमला पोहोचण्यासाठी तब्बल 24 तास लागले. रस्त्यात नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी प्रचंड गर्दी केली. भरपावसात नागरिकांनी गर्दी करुन ओमन चांडी यांना अखेरचा निरोप दिला.
अंत्यसंस्काराला राहुल गांधी उपस्थित : केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचे निधन झाल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. केरळ काँग्रेसचे दिग्गज नेते म्हणून ओमन चांडी यांचे नाव घेतले जात होते. तब्बल 12 वेळा ओमन चांडी हे पुथुपुल्ली मतदार संघातून आमदार झाले आहेत. त्यामुळे काँग्रेसला केरळमध्ये रुजवण्यात त्यांचा महत्वाचा हात होता. त्यामुळेच ओमन चांडी यांचे निधन झाल्यानंतर काँग्रेसनेते राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस तारिक अन्वर, माजी संरक्षण मंत्री एके अँटनी, केपीसीसी प्रमुख के सुधाकरन, विरोधी पक्षनेते व्हीडी सतीसन आदी दिग्गज नेत्यांनी त्यांच्या अंत्यसंस्काराला हजेरी लावली.
पुथुप्पल्लीतील चर्चमध्ये करण्यात आले अंत्यसंस्कार : केरळचे माजी मुख्यमंत्री ओमन चांडी यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर पुथुपुल्लीतील चर्चमध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मलंकारा ऑर्थोडॉक्स सीरियन चर्चचे प्रमुख बेसेलियस मार्थोमा मॅथ्यूज यांनी अंत्यसंस्काराच्या प्रार्थनेचे नेतृत्व केले. आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारो नागरिकांनी या चर्चमध्ये गर्दी केली होती.
हेही वाचा -