नवी दिल्ली - निर्भया कांडातील चार नरधमांच्या फाशीला आज एक वर्ष पूर्ण झाला आहे. 20 मार्च, 2020 रोजी सकाळी 5.30 वाजता निर्भया कांडातील चारही आरोपींना फासावर लटकविण्यात आले होते. तिहार कारागृहात एकाचवेळी चौघांना फाशी देण्याची ती पहिलीच वेळ होती.
निर्भयाप्रकरणी सहा जणांविरोधात झाला होता गुन्हा दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, 16 डिसेंबर, 2012 रोजी झालेल्या निर्भया कांडाप्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यातील एक जण हा अल्पवयीन होता. पाच जणांना याप्रकरणी अटक करण्यात आली होती. दरम्यान, त्या पाच जणांपैकी राम सिंह या आरोपीने तिहार कारागृह गळफास घेत आत्महत्या केली होती. मुकेश सिंह, अक्षय, विनय आणि पवन या चौघांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यांनतर चौघांनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला होता. मात्र, त्यांनीही तो फेटाळला. त्यानंतर 20 मार्च, 2020 रोजी सकाळी 5.30 वाजता त्या चौघांना फासावर लटविण्यात आले. त्यावेळी 15 जणांचे पथक त्या ठिकाणी हजर होते.
फाशीगृह बंद करुन सुधारगृह सुरू करा
निर्भया कांडातील चार नरधमांच्या फाशीला आज एक वर्ष पूर्ण झाला आहे. या पार्श्वभूमीवर विधीज्ञ एपी सिंह यांनी भारतातील फाशीची शिक्षाप्रणाली रद्द करण्यात यावी, अशी मागणी केली. फाशीची शिक्षा देऊनही देशातील महिलांवरील अत्याचार थांबविण्यात कितपत यश आले आहे, असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला. ते म्हणाले, ज्या चौघांना फाशी देण्यात आली होती त्यांची कोणतीही अपराधी पार्श्वभूमी नव्हती. त्यांच्या परिवारातील कोणीही अपराधी नाही. मोल-मजूरी करत त्यांचे कुटुंबिय उदरनिर्वाह करत आहेत. अक्षयला एक लहान बाळ होता. विनयवर त्याच्या बहिणींच्या लग्नाची जबाबदारी होती. पवनचे आई-वडिल वृद्ध आहेत. मुकेशच्या वडिलांचा मृत्यू झाल्याने तो त्याच्या आईचा एकच सहारा होता. या फाशीतून काय सिद्ध झाले, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आणि फाशीगृह बंद करुन सुधारगृह सुरू करा, अशी मागणी केली.
हेही वाचा - प्रियंका गांधींच्या आसाममध्ये होणार सहा सभा
हेही वाचा - दत्तात्रय होसबळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नवे सहकार्यवाह