श्री फतेहगड साहीब (पंजाब) - देशातील किंबहुना जगातील सर्वात मोठे वडाचे झाड पंजाबमध्ये आहे. श्री फतेहगड साहीबमधील छोटली खेडीमध्ये पोहोचताच हे झाड आपल्याला दूरुनही दिसते. शेतांच्या मधोमध असलेले, छत्रीसारखे दिसणारे हे महाकाय झाड तब्बल सहा ते सात एकरांमध्ये पसरलेले आहे. स्थानिकांच्या मते हे झाड ३०० वर्षांहून अधिक जुने आहे. या झाडाला कायाकल्प वृक्ष, तसेच बरोटी साहिब या नावांनीही ओळखले जाते. हे झाड आणखी पसरत चालल्याचे स्थानिक सांगतात.
लोक या जागेचा वापर करत नाहीत -
या झाडाची मुळे तोडण्याचा ज्याने कोणी प्रयत्न केला, त्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे ज्याठिकाणी या झाडाची मुळे पसरली आहेत, त्या जमिनीचा वापर लोक शेतीसाठी करत नाहीत. लोक या झाडाचे लाकूड किंवा पानेही तोडण्यास घाबरतात.
झाडाबाबत प्रचलित दंतकथा -
एकदा एक शेतकरी शेतात काम करत होता. त्यावेळी एक साधू तिथून जात होता. शेतकऱ्याने साधुला काही दिवस त्याच्या घरी राहण्याची विनंती केली. शेतकरी आणि त्याच्या पत्नीने खूप दिवस साधुची सेवा केली. एकेदिवशी शेतकऱ्याची पत्नी साधूला जेवण द्यायला गेली. मात्र, ती उदास वाटत होती. साधूने तिला उदास असण्याचे कारण विचारले. तर तिने सांगितलं की, त्यांना मूल नाही. तिची इच्छा आहे की, त्यांच्या घरात एक बाळ असावे. शेतकऱ्याची पत्नी साधुला तिचं दुःख सांगत होती, त्यावेळी साधू भगवान शंकराची आराधना करत होते, असे म्हणतात. साधूने तिला काहीतरी दिव्य वस्तू खाण्यासाठी दिली आणि म्हटले की, तिच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. शेतकरी घरी आल्यानंतर तिने त्याला सर्व सांगितले. शेतकऱ्याला या गोष्टीवर विश्वास बसला नाही आणि तो म्हणाला की, अशा वस्तूंमुळे त्यांना बाळ मिळणार नाही. त्यामुळे शेतकऱ्याने साधूने दिलेल्या पवित्र राखेला शेतात फेकून देण्यास सांगितले. त्या फेकलेल्या राखेच्या जागेवर हे वडाचं झाड उगवल्याची दंतकथा स्थानिक सांगतात.
हेही वाचा - सिंधुदुर्गात नव्याने सापडले कातळशिल्प; अश्मयुगीन पाऊल खुणा
हेही वाचा - अनेक आजारांवर गुणकारी छत्तीसगडमधील प्रसिद्ध 'चापडा चटणी'