अयोध्या (उत्तरप्रदेश): काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांना संसदेच्या सदस्यत्वासाठी अपात्र ठरवल्यानंतर त्यांना सरकारी निवासस्थान रिकामे करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या घटनेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या मुद्द्याला उचलून धरत काँग्रेसचे कार्यकर्ते 'माझे घर राहुल गांधींचे घर' अशी मोहीम राबवत आहेत. या वादामध्ये महंत ग्यानदास यांचे उत्तराधिकारी, अयोध्येतील आखाडा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रीय संकटमोचन सेनेचे अध्यक्ष संजय दास यांनी राहुल गांधींना हनुमानगढी मंदिर परिसरात राहण्याचे निमंत्रण दिले आहे.
अयोध्येतील हनुमानगढी संकुलात असलेल्या आश्रमात राहणारे महंत ज्ञान दास यांचे उत्तराधिकारी संजय दास यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते त्याचे भांडवल करण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत. आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर करून ते राहुल गांधींना अयोध्येच्या संतांचा पाठिंबा आणि आशीर्वाद असल्याचे सांगत आहेत. संकटमोचन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजय दास यांनी राहुल गांधींना अयोध्येतील त्यांच्या आश्रमात येऊन राहण्याचे निमंत्रण दिले आहे. याआधी अयोध्येतील काँग्रेसच्या सर्व नेत्यांनी आपल्या घरासमोर 'माझे घर हे राहुल गांधींचे घर' असे लिहिलेले स्टिकर लावून राहुल गांधींना घरात राहण्याचे निमंत्रण दिले होते.
राहुल गांधी यांना संसदेतून अपात्र ठरवल्यानंतर त्यांना दिलेला बंगला रिकामा करण्याची नोटीस बजावण्यात आली होती. यानंतर संकटमोचन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दास म्हणाले की, राहुल गांधी यांना हनुमानगढी येथे येऊन राहायचे असेल तर त्यांचे स्वागत आहे. राहुल गांधींनीही अयोध्येत यावे, हनुमानगढीला भेट द्यावी. खासदार म्हणून ते येतच राहतील, ही न्यायालयीन बाब अन् न्यायालयाने दिलेला निर्णय असून तो सर्वांनी स्वीकारला पाहिजे. दरम्यान, काल गुजरातमधील सुरत येथील सत्र न्यायालयातून काँग्रेस नेते राहुल गांधी यांना दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला. त्याचवेळी, या प्रकरणात दोषी ठरलेल्या त्याच्या अपीलवर न्यायालय 13 एप्रिल रोजी सुनावणी करणार आहे.