भुवनेश्वर : बालासोरमधील रेल्वे अपघाताच मृत झालेले सुमारे 100 मृतदेह ओडिशा सरकारने भुवनेश्वर एम्समध्ये आणले आहेत. मृतदेह त्यांच्या कुटुंबियांना सुर्पूत करेपर्यंत व्यवस्थित राहावेत यासाठी एम्समध्ये मृतदेह आणण्यात आले आहेत.
प्रवाशांच्या ओळखीसाठी नियंत्रण कक्ष सुरू : ओडिशातील तिहेरी रेल्वे अपघातातील 160 अज्ञात प्रवाशांपैकी 100 मृतदेह भुवनेश्वरच्या एम्समध्ये ठेवण्यात येणार आहे. याविषयीची माहिती भुवनेश्वरचे डीसीपी प्रतीक गीता सिंह यांनी माहिती दिली. उर्वरित मृतदेह भुवनेश्वरमधील विविध रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या शवागारात ठेवण्यात येतील. अधिकाऱ्यांनी सांगितल्यानुसार, जवळपास 55 मृतदेहांची ओळख पटली आहे. ओळख पटल्यानंतर त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर ते मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहेत. अज्ञात प्रवाशांच्या छायाचित्रांसह 24 तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. " मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईक भुवनेश्वर पोलीस आयुक्तालयाशी संपर्क साधू शकतात,अशी माहितीही डीसीपी यांनी दिली.
चेन्नईमध्ये उपचारासाठी सुविधा : बालासोरमधील अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना घेऊन जाणारी एक विशेष ट्रेन आज पहाटे चेन्नईला पोहोचली आहे. तामिळनाडूच्या आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, येणारे सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. ज्यांना वैद्यकीय सेवा किंवा काळजीची गरज आहे, ती त्यांना दिली जात आहे. चेन्नईला पोहोचलेल्या एकूण प्रवाशांपैकी सात जणांना किरकोळ दुखापत झाली आहे, तर दोन जण गंभीर जखमी आहेत. आम्ही गंभीर रुग्णांना राजीव गांधी शासकीय रुग्णालयात एक्स-रे आणि पुढील उपचारासाठी पाठवले आहे. उपचार घेतल्यानंतर सर्व प्रवाशांना आपापल्या जिल्ह्यात पाठवले जाईल अशी माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे.
अपघाताचे कारण आले समोर : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहनगा बाजार स्थानकावर बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीचा तीन वेगवेगळ्या ट्रॅकवर हा अपघात झाला. यात 288 जणांचा मृत्यू झाला आहे तर 1 हजार 100 जण जखमी झाले आहेत. तीन रेल्वेचा अपघात कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे. इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग करताना जो बदल झाला त्यामुळे हा अपघात झाला असल्याची माहिती रेल्वेमंत्र्यांनी दिली आहे.
हेही वाचा -