नवी दिल्ली - लखीमपूर घटनेच्या तीन दिवसानंतर गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी हे दिल्लीत दाखल झाले. यावेळी त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचीदेखील भेट घेतली. त्यानंतर त्यांनी अनौपचारिकपणे माध्यमांशी बोलताना त्यांच्यावर राजीनाम्यासाठी कोणताही दबाव नसल्याचे म्हटले. तसेच तपासात पूर्णपणे सरकार्य करणार असल्याचेही ते म्हणाले.
गृह राज्यमंत्री अजय मिश्रा तेनी हे गुरुवारी ज्या सरकारी कार्यक्रमाला उपस्थित राहणे अपेक्षित होते, तो पुढे ढकलण्यात आला होता, त्यामुळे केंद्र सरकार तेनी यांचा राजीनामा घेऊ शकते, अशी चर्चा होती. परंतु गृहमंत्र्यांना भेटल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी अनौपचारिक संवाद साधला. त्यावेळी त्यांनी त्यांच्यावर राजीनामा देण्याचा कोणताही दबाव नाही, अशी प्रतिक्रिया दिली. त्यानंतर ते नॉर्थ ब्लॉकमधील त्यांच्या कार्यालयाकडे रवाना झाले.
काय घडली होती घटना?
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे.