कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज विधानसभेत अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. एप्रिल-मे मध्ये पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता आहे. अंतरिम अर्थसंकल्प सादर करतेवेळी ममता बॅनर्जी यांनी कोलकाता पोलीस दलात एका नवीन बटालियनची घोषणा केली. त्या बटालियनचे नाव 'नेताजी बटालियन' असे असणार आहे.
भाजपाच्या आमदारांचा गदारोळ -
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्यपालांना विधानसभेत आमंत्रित न केल्याबद्दल भाजपाच्या आमदारांनी सभागृहात गोंधळ घातला. तसेच डाव्या आणि काँग्रेसच्या आमदारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार टाकला.
दिलीप घोष यांची प्रतिक्रिया -
पश्चिम बंगालमधील विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन राज्यपालांच्या भाषणाशिवाय आयोजित केले जात आहे. हे कसे केले जाऊ शकते, असा सवाल पश्चिम बंगालचे भाजपा अध्यक्ष आणि खासदार दिलीप यांनी केला. मागच्या दारातून सत्तेत राहण्याची परवानगी आपले संविधान देत नाही, असेही ते म्हणाले.
नेताजींची 125 वी जयंती -
भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील हिरो नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 23 जानेवरीला 125 वी जयंती साजरी करण्यात आली. या वर्षीपासून नेताजींची जयंती 'पराक्रम दिन' म्हणून साजरी केली जात आहे. या दिवसाला नेताजींच्या धाडसी पराक्रमाची ओळख देण्यात आली आहे. तसेच आता नेताजींच्या सन्मानार्थ ममता बॅनर्जी यांनी कोलकाता पोलीस दलात 'नेताजी बटालियन' ची घोषणा केली.