नवी दिल्ली - प्लास्टिकमुळे पर्यावरणाची मोठी हानी होते. त्यामुळे अनेक प्लास्टिक वस्तूंच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, तरीही लोक प्लास्टिकचा सर्रास वापर करतात. रेल्वेस्थानकांवर देखील प्लास्टिकच्या कपातून चहा दिला जातो. त्यामुळे देशातील 400 रेल्वेस्थानकांवर कुल्हड कप अनिवार्य करण्यात आले होते. हा उपक्रम यशस्वी ठरला असून आता देशातील सर्व रेल्वेस्थानकांवर कुल्हडमधून (मातीचे कप) चहा मिळणार असल्याचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले.
प्लास्टिकमुक्त भारतासाठी रेल्वेकडून हे एक मोठे योगदान असेल. तसेच या उपक्रमामुळे अनेक लोकांना रोजगार मिळेल. कुल्हडमधून चहा देणे हे काही नवे नसून ही तशी जुनीच कल्पना आहे, असे गोयल म्हणाले. रविवारी राजस्थानमधील अल्वार जिल्ह्यात उत्तर-पश्चिम रेल्वेच्या एका कार्यक्रमात रेल्वमंत्री पीयूष गोयल यांनी ही माहिती दिली. धिगवारा -बांदीकुई भागातील विद्युतीकरणाचे उद्घाटन गोयल यांनी केले.
कुल्हड ठेवणे बंधनकारक -
गेल्या वर्षी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वेस्थानके, विमानतळ, बस डेपो आणि मॉलमधील कँटीनमध्ये चहा देण्यासाठी कुल्हड ठेवणे बंधनकारक असल्याचे पत्र रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना दिले होते. त्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात आली होती.
लालूप्रसाद यांच्या कार्यकाळात सर्वप्रथम 'कुल्हड'चा वापर -
राजद प्रमुख लालूप्रसाद यांच्या कार्यकाळात सर्वप्रथम म्हणजेच 2004मध्ये रेल्वेस्थानकांवर 'कुल्हड'चा वापर सुरू करण्यात आला होता. कुल्हडमधून चहा विकल्यानंतर ते पर्यावरणपूरक ठरेल. तसेच कुंभार व्यावसायिकांना चांगले दिवस येतील, हा त्यामागचा हेतू होता. मात्र, दोन वर्षानंतर ही योजना बंद पडली होती.