कोची (केरळ) Navy Helicopter Crashes : कोचीच्या आयएनएस गरुड धावपट्टीवर शनिवारी दुपारी नौदलाच्या चेतक हेलिकॉप्टरचा अपघात झाला. या अपघातात एका नौदल अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हेलिकॉप्टरमध्ये दोन जण होते. दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान अपघात झाला : प्रशिक्षण कार्यक्रमादरम्यान हा अपघात झाला असून यात पायलटला दुखापत झाली. अपघातानंतर नौदलाचे अधिकारी आणि कोची हार्बर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. हेलिकॉप्टरनं नौदल मुख्यालय विमानतळावरून उड्डाण घेतलं, मात्र ते लगेच धावपट्टीवर कोसळलं. सध्या बचावकार्य सुरू आहे.
अपघाताच्या तपासाचे आदेश दिले : नौदलाचे अधिकारी आणि कोची हार्बर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, जखमीवर कोचीतील नौदल तळ रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 'चेतक हेलिकॉप्टरचा आज INS गरुडा, कोची येथे देखभाल तपासणी दरम्यान अपघात झाला. यात एका ग्राउंड क्रूचा दुर्दैवी मृत्यू झालाय. अपघाताचं कारण शोधण्यासाठी चौकशी मंडळाला आदेश देण्यात आले आहेत,' असं भारतीय नौदलाचे प्रवक्ते म्हणाले.
या आधीही अपघात झाले आहेत : आयएनएस गरुड हे भारतीय नौदलाचं प्रमुख हवाई प्रशिक्षण केंद्र तसेच ऑपरेशनल बेस आहे. ते भारतीय नौदलासाठी एक धोरणात्मक ऑपरेटिंग स्टेशन राहिलं आहे, ज्यामध्ये अनेक प्रशिक्षण शाळा, गुप्तचर केंद्रं, देखभाल आणि दुरुस्ती सुविधा आहेत. या वर्षी मे महिन्यात भारतीय सैन्याच्या एका हेलिकॉप्टरनं काश्मीरमध्ये 'हार्ड लँडिंग' केल्यामुळे एकाचा मृत्यू झाला होता. यामध्ये विमानातील दोन पायलटही जखमी झाले होते. त्या आधी मार्चमध्ये अरुणाचल प्रदेशात भारतीय सैन्याचं चित्ता हेलिकॉप्टर कोसळून पायलट आणि सहवैमानिक ठार झाले होते.
हेही वाचा :