बडोदा(गुजरात) - भारताची आर्थिक राजधानी मुंबई आणि गुजरातची आर्थिक राजधानी अहमदाबाद दरम्यान प्रवास जलद व्हावा यासाठी केंद्र सरकारने बुलेट ट्रेनचा ड्रीम प्रोजेक्ट राबवला आहे. बडोदा बुलेट ट्रेन मार्गावरील जमीन भूसंपादनाची कामे सध्या पूर्ण झाली आहेत. तसेच येथील स्टेशनवर प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे. मुंबई ते अहमदाबाद दरम्यान तब्बल 12 बुलेट ट्रेन स्टेशन्स बांधली जाणार आहेत. त्यातील बडोदा हे व्यापाराच्या दृष्टीने महत्त्वाचे स्टेशन असणार आहे. बडोदा स्टेशन भागातील बुलेट ट्रेनच्या कामाची 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधींनी ग्राऊंडवर जाऊन पाहणी केली असता, तेथे काम सुरू असल्याचे दिसून आले आहे.
काम कुठपर्यंत आले? - गुजरातमध्ये बुलेट ट्रेनचा मार्ग अनेक नद्यांमधून जाणार आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेडने माहिती दिली आहे की, गुजरातमधील बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या 352 किमी मार्गावर 100 किमी पेक्षा जास्त क्षेत्रात बुलेट ट्रेन मार्गाच्या पुलांचे बांधकाम पूर्ण झाले आहे, मुख्यतः खेडा, आणंद, वडोदरा, भरुचमध्ये काम मोठ्या प्रमाणावर झाले आहे. नवसारीजवळ ९.२ किमीच्या व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे. सध्या गुजरातमधील 8 जिल्ह्यांमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. साबरमती, माही, तापी, नर्मदा नदीवरील पुलाचे काम सुरू आहे. बडोदा शहरातील रेल्वे स्थानक परिसरात अजूनही बुलेट ट्रेनचे अत्यल्प काम असले तरी बडोदापूर्वी आनंद परिसरात बुलेट ट्रेनच्या पिलरचे काम सुरू आहे.
![bullet train](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17506376_info.jpg)
भूसंपादनाची स्थिती - बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी दोन्ही राज्यात एकूण 97.82 टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. गुजरातमध्ये ९८.८७ टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. तर दमण-दादर आणि नगर-हवेलीमध्ये 100 टक्के भूसंपादन, महाराष्ट्रात 95.45 टक्के जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रापेक्षा गुजरातमध्ये बुलेट ट्रेन प्रकल्पाचा वेग आला आहे.
भूसंपादनासाठी दिले हजारो करोड रुपये - अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेनचा चालवण्याचा वेग ताशी 320 किमी निश्चित करण्यात आला आहे. गर्दीच्या वेळेत दर 20 मिनिटांनी आणि नॉन-पीक अवर्समध्ये दर 30 मिनिटांनी सकाळी 6 ते मध्यरात्री 12 पर्यंत ट्रेन उपलब्ध असतील. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड या प्रकल्पाचे बांधकाम, व्यवस्थापन आणि प्रशासन करणार आहे. आतापर्यंत, गुजरातमध्ये भूसंपादनासाठी 5,707 कोटी रुपये आणि महाराष्ट्रात 2,110 कोटी रुपयांहून अधिक रक्कम अदा करण्यात आली आहे.
![bullet train](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/17506376_infog.jpg)
बुलेट ट्रेनबद्दल माहिती - बुलेट ट्रेनचा वेग 320 किमी प्रतितास असणार आहे. तसेच मुंबई ते अहमदाबाद दरम्यानचे ५०८ किमीचे अंतर अवघ्या २ तास ७ मिनिटांत कापले जाणार आहे. अहमदाबादमधील साबरमती येथे बुलेट ट्रेनचे शेवटचे स्टेशन बांधले जाणार आहे. हे स्टेशन जपानच्या शिंकनसेन डिझाइनच्या आधारे तयार केले जाणार आहे. या प्रकल्पात 55 लाख मेट्रिक टन सिमेंट आणि 15 लाख मेट्रिक टन स्टीलचा वापर केला जाणार आहे.