लखनऊ : उत्तर प्रदेशचा आमदार आणि गुंड मुख्तार अन्सारीला राज्यात परत आणण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक पंजाबला पोहोचले आहे. पहाटे चारच्या सुमारास बांदा पोलिसांचे पथक रुपनगरला पोहोचले. याठिकाणी असलेल्या रोपड तुरुंगात मुख्तार कैद आहे. त्याला बांदा तुरुंगात हलवण्यात येणार आहे.
यूपी पोलिसांचे 'स्पेशल १००'..
मुख्तारला नेण्यासाठी वाहनांच्या एका ताफ्यासह रुग्णवाहिकेचाही समावेश आहे. पोलिसांनी त्याला परत आणण्यासाठी 'प्लॅन ए' आणि 'प्लॅन बी' अशा दोन योजना तयार केल्या आहेत. पंजाबला १०० पोलिसांचे एक विशेष पथक पोहोचले आहे. यामध्ये दोन पोलीस उपअधीक्षक, एक सीओ, दोन पोलीस निरीक्षक, सहा पोलीस अधिकारी, २० हेड कॉन्स्टेबल आणि २० कॉन्स्टेबल यांचा समावेश आहे. यासोबतच बांदा पोलिसांचे स्पेशल ऑपरेशन पथकही यात सहभागी आहे. या सर्वांकडे अत्याधुनिक शस्त्रे आहेत. वाहनांच्या ताफ्यामध्ये छोटे वज्र वाहन, बोलेरो गाडी आणि सात निळ्या पोलीस गाड्यांचा समावेश आहे. पोलिसांच्या पथकासोबतच एक वैद्यकीय पथकही पाठवण्यात आले आहे.
चांगला क्रिकेटपटू ते वॉन्टेड क्रिमिनल..
एकेकाळी चांगला क्रिकेटपटू असणारा अन्सारी पुढे अंडरवर्ल्डमध्ये गेला होता. त्यानंतर वाराणसी आणि उत्तर प्रदेशच्या पश्चिमी भागात त्याने मोठा धुडगूस घातला होता. भाजपा नेते कृष्णानंदा राय यांच्या हत्येमधील मुख्य आरोपी म्हणूनही त्याचे नाव पुढे आले होते. यानंतर एका खंडणीच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर त्याला पंजाबच्या तुरुंगात टाकण्यात आले होते. तेव्हापासून उत्तर प्रदेश सरकार अन्सारीचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यापूर्वी ५४ वेळा उत्तर प्रदेश पोलिसांनी अन्सारीचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला आहे.
हेही वाचा : दीदींचे मोठे विधान, 'बंगाल विधानसभा निवडणुकीनंतर लक्ष दिल्लीतील सत्तेकडे'