दमोह - महाराष्ट्रात ओलीस ठेवलेल्या मध्य प्रदेशच्या दामोहमधील मजुरांना मुक्त करण्यात कामगार विभागाला यश आले आहे. तसेच ठेकेदाराविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित ठेकेदार मजुरांना जनावरांप्रमाणे काम करायला लावत होता. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील बंदुर गावात घडली आहे.
मध्य प्रदेशच्या दमोह येथून जवळपास 14 मजूर आपल्या 5 मुलांसह कामाच्या शोधात महाराष्ट्रात गेले होते. तिथे एका ठेकेदाराकडे काम करत होते. ठेकेदाराने मजुरांना ओलिस ठेवले. तसेच जबरदस्तीने मारहाण करून अतिरिक्त कामे करून घेतली. मजुरांच्या कुटुंबीयांना याची माहिती मिळताच त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे दाद मागितली. यावर दमोहचे जिल्हाधिकारी तरुण राठी यांनी तातडीने एक पत्र कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्याला लिहलं. तसेच कामगार विभागाचे पथक आणि काही अधिकारी तातडीने कोल्हापुरातील बंदूर गावी रवाना झाले. या पथकाने मुले व मजुरांना मुक्त केले आणि दमोहला परत आणले. या मजुरांमध्ये 8 पुरुष, 6 महिला आणि 5 मुले आहेत.
मजुरांची नावे -
यात दीपक अहिरवार, मोतीलाल अहिरवार, भगवत अहिरवार, अमर अहिरवार, राजा अहिरवार, वीरू अहिरवार, काशीराम अहिरवार आणि भागीरथ अहिरवार तर महिलांमध्ये कुसुम मोतीलाल अहिरवार, गीता अहिरवार, रेशमा अहिरवार, तुलसा अहिरवार, लीला अहिरवार, कविता अहिरवार यांचा समावेश आहे.
ठेकेदाराविरुध्द गुन्हा दाखल केला -
मुख्य आरोपी कंत्राटदार बाबा सय्यद यांच्यावर 08 कलमांखाली एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तसेच, मजुरांना त्वरित 20 हजार रुपयांची मदत लागू केली गेली आहे. जी मजुरांच्या खात्यात जमा होईल. कामगारांनी प्रशासनाचे आभार मानले आहेत.