सतना (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यात 'निर्भया'सारखी घटना घडली आहे. येथे एका 10 वर्षांच्या मुलीवर नराधमांनी आधी सामूहिक बलात्कार केला, आणि त्यानंतर तिच्या प्रायव्हेट पार्टमध्ये लाकूड टाकले. ही घटना समोर आल्यानंतर राज्यात खळबळ माजली आहे. या घटनेसंदर्भात अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. गँगरेपचा आरोप असलेल्यांमध्ये मां शारदा मंदिर समितीच्या दोन कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. घटनेतील चारही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
कुठे घडली घटना : ही घटना सतना जिल्ह्यातील मैहरची आहे. जिल्हा मुख्यालयापासून 55 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावातील टेकडीवर गुन्हेगारांनी हे दुष्कर्म केले. हा प्रकार शुक्रवारी सकाळी घडला. मुलीला तिच्या कुटुंबीयांनी रक्ताने माखलेले पाहिले तेव्हा ही बाब उघडकीस आली. मैहरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारानंतर जखमी मुलीला रेवा मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले आहे.
आरोपींविरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल : या प्रकरणातील 4 आरोपींपैकी 2 आरोपी माँ शारदा समितीचे कर्मचारी आहेत. त्यांच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेबाबत मैहरचे एसडीएम सुरेश आणि एसडीओपी लोकेश दावर यांनी सांगितले की, 'आरोपींना अटक करण्यात आली असून, कुणालाही सोडले जाणार नाही. घटनेचा तपास सुरू आहे. चौकशीही केली जात आहे'. आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी मंदिराजवळ खेळणाऱ्या मुलीला पकडून डोंगरावरील झुडपांच्या मागे नेले आणि तेथे हे कृत्य केले.
मुख्यमंत्री कठोर : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या प्रकरणी नाराजी व्यक्त केली आहे. ते ट्विटद्वारे म्हणाले की, जे दोषी असतील त्यांना कोणत्याही परिस्थितीत सोडले जाणार नाही. संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून दोषींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे, असे ते म्हणाले आहेत. या प्रकरणी विरोधकांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांनी या घटनेवरून सरकारवर टीका केली आहे. पीडित मुलीच्या उपचारासोबतच कमलनाथ यांनी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे एक कोटी रुपयांच्या नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
मध्य प्रदेशात दर 3 तासाला 1 बलात्कार : मध्य प्रदेशातील अशाप्रकारची ही पहिलीच घटना नाही. काही दिवसांपूर्वीच इंदूरमध्ये 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. NCRB च्या आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशात लहान मुलांविरुद्ध मोठ्या प्रमाणात गुन्हे होत आहेत. तसेच अल्पवयीन मुलांवरील लैंगिक शोषणाच्या प्रकरणांमध्येही देखील कमालीची वाढ झाली आहे. आकडेवारीनुसार, मध्यप्रदेशात दर 3 तासाला एका मुलीवर बलात्कार होतो आहे.
हेही वाचा :