भोपाळ MP Assembly Election : मध्य प्रदेशात येत्या नोव्हेंबर महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेसनं रविवारी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत १४४ नावं जाहीर करण्यात आले आहेत. काँग्रेसनं आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून ही यादी जाहीर केली.
कमलनाथ येथून लढणार : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांना छिंदवाडामधून उमेदवारी देण्यात आली आहे. तर इंदूरमधून भाजपाचे ज्येष्ठ नेते कैलाश विजयवर्गीय यांच्या विरोधात संजय शुक्ला रिंगणात उतरले आहेत. कॉंग्रेसच्या या पहिल्या यादीत अनेक माजी मंत्र्यांचीही नावं आहेत. लखन सिंह यादव यांना भितरवार, जयवर्धन सिंह यांना राघोगढ, हर्ष यादव यांना देवरी, कमलेश्वर पटेल यांना सिहवाल, लखन घनघोरिया यांना जबलपूर पूर्व, तरुण भानोत जबलपूर पश्चिम, ओंकार सिंह मरकाम यांना दिंडोरी, हिना कांवरे यांना लांझी, सुखदेव पानसे यांना मुलताई, सज्जनसिंह वर्मा यांनी सोनकच्छ, प्रियव्रत सिंह यांना खिलचीपूर, विजयालक्ष्मी साधौ यांना महेश्वर, सचिन यादव यांना कासरवाड तर वाला बच्चन यांना राजपूर येथून उमेदवारी देण्यात आली आहे. हे सर्व नेते कमलनाथ सरकारमध्ये मंत्री होते.
शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात कोण : बुधनी येथून मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात काँग्रेसनं अभिनेते विक्रम मस्ताल यांना रिंगणात उतरवलंय. विक्रम मस्ताल गेल्या अनेक महिन्यांपासून बुधनी मतदारसंघात सक्रिय आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवराज सिंह चौहान यांच्या विरोधात माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव लढले होते. मात्र त्यांचा पराभव झाला होता.
भोपाळच्या तीन जागांसाठी उमेदवार घोषित : काँग्रेसनं भोपाळच्या नरेला विधानसभा मतदारसंघातून युवा नेते मनोज शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. या जागेवर गेल्या दोन विधानसभा निवडणुकांपासून भाजपाचे आमदार आणि शिवराज सरकारमधील मंत्री विश्वास सारंग यांचा कब्जा आहे. आरिफ मसूद भोपाळ मध्य विधानसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले असून त्यांचा सामना भाजपाच्या ध्रुव नारायण सिंह यांच्याशी होणार आहे. भोपाळच्या बैरसिया विधानसभा मतदारसंघातून जय श्री हरी किरण पुन्हा एकदा रिंगणात उतरले आहेत.
हेही वाचा :