नवी दिल्ली - आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा दहावा दिवस असून संसदेत विरोधक गोंधळ घालण्याची शक्यता आहे. विरोधकांच्या प्रत्येक प्रश्नाला सरकार उत्तर देण्यास तयार असल्याचे केंद्र सरकारने म्हटलं आहे. तर संसदेत बोलण्याची संधी दिली जात नसल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच सरकार पेगासस मुद्यांवरही बोलण्यास तयार नसल्याचे विरोधी नेत्यांनी म्हटलं आहे. तर दुसरीकडे काँग्रेस संसदेचे कामकाज चालू देत नसून फक्त गोंधळ घालत असल्याचा आरोप सत्ताधारी नेत्यांनी केला आहे. पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यापासून सभागृहाच्या निर्धारित वेळेच्या 107 तासांपैकी फक्त 18 तासच कामकाज चालले आहे.
राज्यसभेत फक्त कोरोनावर चर्चा झाल्याचे पाहायला मिळाले. तर लोकसभामध्ये कोणत्याच विषयावर चर्चा झालेली नाही. केंद्र सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात महत्त्वपूर्ण कायदे पारित केले आहेत. पेगासस हेरगिरी प्रकरणावर चर्चा करण्याची मागणी विरोधक करत आहेत. तर आयटी मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानंतरच चर्चा केली जाऊ शकते, असे सरकारने म्हटलं आहे. विशेष म्हणजे संसदेच्या एका मिनटाच्या कामकाजासाठी लाखो रुपये खर्च होतात.
प्रह्लाद जोशी आणि पीयूष गोयल यांनी विरोधी पक्ष नेत्यांची बैठक घेतली. परंतु, त्याचा काही उपयोग झाल्याचे दिसून आले नाही. विरोधी पक्षाचे सदस्य सातत्याने घोषणाबाजी करत कामकाजात अडथळा आणत आहेत. विरोधकांचा संसदेतील व्यव्हार दुर्भाग्यपूर्ण असल्याची प्रतिक्रिया प्रह्लाद जोशी यांनी दिली. पेगासस हा गैर मुद्दा आहे. याशिवाय लोकांच्या हिताचे दुसरे मुद्दे आहेत. ज्यावर चर्चा होणे गरजेचे आहे. चर्चा न करता विधेयक पारित करण्याची सरकारची इच्छा नाही. मात्र, विरोधक कामकाज करू देत नसून गोंधळ घालत असल्याचेही जोशी म्हणाले.
संसदेचे सत्र 13 ऑगस्टपर्यंत चालणार -
संसदेचे पावसाळी अधिवेशन 19 जुलैला सुरू झाले आहे. काही विधेयके सोडली, तर राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहात महत्त्वपूर्ण कामकाज झालेले नाही. पेगासस आणि शेतकरी आंदोलनावरून विरोधक संसदेत प्रश्न उपस्थित करत आहेत. यामुळे आतापर्यंत संसदेचे कामकाज बाधित होत आहे. संसदेचे सत्र 13 ऑगस्टपर्यंत चालणार आहे.