नवी दिल्ली - रविवारी दिल्लीतील एका व्यक्तीला मंकी पॉक्स ( monkeypox ) असल्याचे निदान झाले आहे. पश्चिम दिल्लीत राहणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्तीला मंकी पॉक्स ( Monkeypox case in delhi ) आजार असल्याचे स्पष्ट झाले. तथापि, नजिकच्या काळात त्याने कोणताही परदेश दौरा केलेला नाही. मात्र, काही दिवसांपूर्वी हा रुग्ण हिमाचल प्रदेशातील कुल्लू मनाली येथे उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी गेला होता. डॉक्टरांच्या देखरेखीखाली दिल्लीतील एलएनजेपी रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
देशात आतापर्यंत मंकी पॉक्सचे एकूण चार रुग्ण आढळून आले आहेत. याआधीची तीन प्रकरणे केरळमधील आहेत. दिल्लीतही मंकी पॉक्सचे प्रकरणे समोर आल्यानंतर दिल्ली सरकार सतर्क झाले आहे. दिल्ली सरकारने लोकनायक जयप्रकाश हॉस्पिटलला नोडल सेंटर बनवले आहे. यासंदर्भात लोकनायक जयप्रकाश रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. सुरेश कुमार सांगतात की, मंकी पॉक्सच्या पार्श्वभूमीवर सहा खाटांचा आयसोलेशन वॉर्ड करण्यात आला आहे. येथे कार्यरत डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना मंकी पॉक्सबाबत प्रशिक्षण दिले जात आहे. पहिल्या रुग्णाला विलगीकरण केंद्रात ठेवण्यात येणार आहे. जेथे अशा रूग्णांची भारत सरकार आणि WHO च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार चाचणी आणि उपचार केले जातील. यासाठी आज 20 डॉक्टर, परिचारिका आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्रतिबंधात्मक उपाय - मंकी पॉक्स रोग संसर्गजन्य आहे. या आजारापासून स्वतःचे रक्षण करण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. N-95 मास्क यासाठी खूप प्रभावी आहे. यासोबतच कोविड-19 मध्ये पीपीई किटचा वापर केला जात होता तसेच यावेळीही मंकी पॉक्सच्या उपचारादरम्यान पीपीई किट घालणे आवश्यक आहे.
दुर्लक्ष करू नका - संक्रमित किंवा संशयित रुग्ण असेल तर त्याच्या त्वचेचा नमुना तपासणीसाठी पुण्याला पाठवला जातो, असे डॉक्टरांनी म्हटले आहे. मंकी पॉक्सचे परदेशात अनेक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे ज्या देशात मंकी पॉक्स रुग्ण आढळले आहेत अशा देशातून आलेल्या व्यक्तीस अशी लक्षणे आढळण्याची शक्यता जास्त आहे. त्या व्यक्तीला त्वचेवर बारीक फोड, ताप येणे, डोळे लाल होणे, सांधेदुखीची लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीने त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधावा. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करू नये. भारतात 14 जुलै रोजी मंकी पॉक्सचा पहिली रुग्ण आढळला होता. जागतिक आरोग्य संघटनेच्या ( WHO ) म्हणण्यानुसार, मंकी पॉक्स 63 देशांमध्ये पसरला आहे. संपूर्ण जगात आतापर्यंत 9000 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत, ज्यामध्ये तीन रुग्णांचा मृत्यू झाला झाला आहे.