रायपूर - प्रजासत्ताक दिनी दिल्लीत लाल किल्ल्यावर हिंसा झाली. यावर छत्तीसगढचे कॅबिनेट मंत्री रविंद्र चौबे यांनी हिंसेमागे केंद्र सरकारचा हात असल्याचा आरोप केला आहे. दिल्लीतील हिंसाचारामागे स्पष्टपणे केंद्र सरकाराचा हात होता. लाल किल्ल्यात सामान्य दिवशीही एखादी व्यक्ती घुसू शकत नाही. लाल किल्ला सर्वांत सुरक्षित ठिकाण मानलं जात. चारही बाजूने कडक सुरक्षा असते. अशात भाजपा खासदाराचा सहाय्यक झेंडा घेऊन लाल किल्ल्यात कसा घुसू शकतो, असा सवाल त्यांनी केला.
प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रीय राजधानीत शेतकऱ्यांनी कृषी कायद्यांच्याविरोधात ट्रॅक्टर रॅली काढली. यावेळी शेतकरी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. शेतकरी मोठ्या संख्येने लाल किल्ल्यावर पोहोचले आणि लाल किल्ल्याच्या घुमटावर निशाण ए साहिब ध्वज फडकविला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली होती. आंदोलक मागे हटत नसल्याचे पाहून पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला आहे.
आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात -
उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दिल्लीत काल झालेल्या हिंसक आंदोलनामागे पाकिस्तानचा हात असल्याचे पुरावे समोर येत असल्याचा दावा केला आहे. अराजकता पसरवणाऱ्या लोकांनी हिंसा केली, असे ते म्हणाले. तसेच हरियाणाचे शिक्षणमंत्री कंवरपाल गुर्जर यांनीदेखील या घटनेची निंदा करत, यामागे चीनचा हात असल्याचे म्हटले आहे.