बंगळुरु - एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी आता बिहार, पश्चिम बंगाल आणि गुजरातनंतर कर्नाटक विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. 2023 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुका लढवणार असल्याचे त्यांनी आज जाहीर केले.
हैदराबादच्या दारुसलाममध्ये गुलबर्गाच्या नेत्यांसमवेत मजलिस अध्यक्षांनी आज बैठक घेतली. गुलबर्गा उत्तर येथील मजलिस उमेदवार म्हणून त्यांनी इलायस सेठ यांच्या नावाची घोषणा केली.
बिहार विधानसभा निवडणुकीत पाच जागा जिंकल्यामुळे एआयएमआयएमला नवचैतन्य लाभले आहे. एआयएमआयएम 2022 मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूक लढवणार आहे. याचबरोबर पश्चिम बंगालमध्येही विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. दरम्यान, काँग्रेस आणि अन्य पक्ष एमआयएमवर भाजपची बी टीम असल्याचा आरोप करतात. तसेच भाजपविरोधकांचे मते खाण्याचा त्यांच्यावर आरोप केला जातो.
कर्नाटक विधानसभा -
कर्नाटकात जनता दल (सेक्युलर) आणि काँग्रेसची राजवट उलथवून भाजप सरकार सत्तेत आले आहे. कर्नाटक विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने जनता दलाला (सेक्युलर) पाठिंबा देत डी. कुमारस्वमी यांना मुख्यमंत्रिपदावर बसवले होते. मात्र, नंतरच्या काळात काँग्रेसमधील अंतर्गत बंडाळीमुळे अनेक आमदार फुटले. हे आमदार भाजपला जाऊन मिळाले होते. त्यामुळे कर्नाटकात पुन्हा भाजपचे सरकार आले. या सरकारची धुरा येडियुरप्पा यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. आता पुन्हा 2022 मध्ये कर्नाटकात विधानसभा निवडणुका होणार आहेत.