बंगळुरू - कर्नाटकातील मंगळुरू किनारपट्टीवर एका विदेशी जहाजाने भारतीय मच्छिमारांच्या बोटीला धडक दिली होती. त्यानंतर बोटीतील मच्छिमार बेपत्ता झाले आहेत. मच्छिमारांचा शोध सुरू असून बचावकार्याला गती देण्यात आली आहे. नौदलाच्या हाती तीन मृतदेह लागले आहेत. विशेष उपकरणे आणि नौदलाच्या गोताखोरांचा वापर करून बेपत्ता मच्छिमार शोधण्यासाठी सुमारे 150 मीटर खोल पाण्यात शोधमोहीम सुरू आहे.
शुक्रवारी तीन मच्छिमारांचे मृतदेह सापडले होते. ते शनिवारी मंगळुरु येथील स्थानिक अधिकाऱ्यांना सोपवण्यात आले. 13 एप्रिलला मंगळुरू किनाऱ्यापासून जवळजवळ 41 नाविक मैलांवर सिंगापूर-नोंदणीकृत एमव्ही एपीएल ली हार्वेशी भारतीय मच्छिमारांच्या बोटीची धडक झाली होती. तेव्हा एकूण 14 मच्छिमार बोटीवर होते. सिंगापूरच्या जहाजात बसलेल्या दोन कर्मचाऱ्यांनी दोन मच्छिमारांना तातडीने वाचवले होते. तर शोधमोहिमेदरम्यान तीन मृतदेह बाहेर काढण्यात आले. आयएनएस निरीक्षककडून शोधमोहीम सुरू असून उर्वरित मच्छिमारांचा शोध घेण्यात येत आहे.