इडुक्की ( केरळ ) : केरळच्या इडुक्की जिल्ह्यातील मूलमट्टम येथे गोळ्या झाडून एकाची हत्या करण्यात ( Man Shot Dead ) आली. या हल्ल्यामध्ये दुसरा एक जण गंभीर जखमी झाला आहे. सनल साबू असे मृताचे नाव असून, तो किरीथोडे येथील बस कर्मचारी होता.
आरोपीला केले अटक : मूलमट्टोम येथील त्याचा मित्र प्रदीप याला गंभीर जखमी अवस्थेत थोडुपुझा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मूळचा मूलमट्टम येथील रहिवासी असलेल्या आरोपी फिलिप मार्टिनला त्याच्या बंदुकीसह अटक करण्यात आली.
भांडणातून झाला गोळीबार : ही घटना काल ( दि. २६ ) रात्री 10 वाजता मूलमट्टम हायस्कूलसमोर घडली. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, अशोक जंक्शन येथे फूड कार्टमध्ये झालेल्या भांडणाच्या वेळी गोळीबार झाला. वादाच्या वेळी, फिलिप मार्टिनने कारमधून शस्त्र घेतले आणि तेथे असलेल्या लोकांना लक्ष्य करून गोळीबार सुरू केला.
दोघांवर झाला गोळीबार : मात्र, तेथे कोणीही जखमी झाले नाही. त्यानंतर फिलिप मार्टिन त्याच्या कारमधून घटनास्थळावरून निसटला आणि थोडुपुझाच्या दिशेने गेला. वाटेत, कारने सनल आणि प्रदीप चालवत असलेल्या दुचाकीला धडक दिली. पुन्हा त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली आणि फिलिप मार्टिनने या दोघांवर गोळीबार केला.