कोलकाता - पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून राजकीय घडामोडींनी वेग घेतला आहे. बुधवारी मतदारसंघ नंदीग्राममध्ये उमेदवारी अर्ज दाखल करून परतताना मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला. यात त्यांच्या डाव्या पायला गंभीर दुखापत झाली असून कोलकाताच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विरोधकांनी माझ्यावर हा हल्ला घडवून आणल्याचा आरोप दीदींनी केला आहे.
ममता बॅनर्जी यांचा एमआरआय करण्यात आला आहे. तपासणीत त्यांच्या डाव्या पायाला, उजव्या खांद्याला आणि मानेला दुखापत झाली आहे. तसेच घटनेपासून त्यांच्या छातीत दुखत असून त्यांना श्वास घेण्यासही त्रास होतोय. म्हणून त्यांना 48 तास देखरेखी खाली ठेवण्यात येत आहे, अशी माहिती एसएसकेएम हॉस्पिटलचे डॉक्टर एम. बंडोपाध्याय यांनी पत्रकारांना सांगितलं.
दीदींचा सहानभूती मिळण्याचा प्रयत्न -
ममता बॅनर्जी गाडीमध्ये बसत असताना चार-पाच लोकांनी जोरात गाडीचा दरवाजा ढकलला. यावेळी ममता यांना गंभीर दुखापत झाली. तृणमूल काँग्रेसने या घटनेची तक्रार निवडणूक आयोगाकडे करणार असल्याचे सांगितलं आहे. तर भाजपचे महासचिव आणि पश्चिम बंगालचे प्रभारी कैलाश विजयवर्गीय यांनी सहानभूती मिळवण्यासाठी ममता यांनी हा स्टंट केल्याचा आरोप केला आहे. भाजप नेते अर्जुन सिंह यांनी ममता बॅनर्जी नाटक करत आहेत, असा आरोप केला.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक -
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. सत्तेत येण्यासाठी भाजपाकडून मोर्चेबांधणी सुरू आहे. तर सत्ता कायम ठेवण्यासाठी आणि भाजपाचा राज्यात प्रवेश रोखण्यासाठी तृणमूल काँग्रेसकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासाठी ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे. पश्चिम बंगालमध्ये 294 विधानसभा मतदारसंघासाठी मतदान 8 टप्प्यात मतदान होणार आहे.
हेही वाचा - VIDEO - पश्चिम बंगालमध्ये चहाचं राजकारण; दीदींच्या हातात केटली