कोलकाता - केंद्र आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षाचे सरकार असले की यांच्यात वाद हे नेहमीच होत राहतात. पण सध्या मोदी सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्यातील संघर्ष वरचेवर उफाळून येतो आहे. आज ममता बॅनर्जी यांनी लसीकरणावरून मोदी सरकारवर पुन्हा निशाणा साधला. डिसेंबर 2021 पूर्वी सर्वांचे लसीकरण करणार, ही मोदी सरकारची आणखी एक लबाडी आहे, अशी टीका ममता बॅनर्जी यांनी केली.
देशात वेगाने लसीकरण मोहीम राबवण्यात येत असून डिसेंबर 2021 पर्यंत संपूर्ण देशातील नागरिकांचं लसीकरण होईल, असे केंद्र सरकारने म्हटलं आहे. यावर ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली.
'डिसेंबर 2021 पूर्वी सर्वांचे लसीकरण हा केवळ एक मोदी सरकारचा लबाडखोरपणा आहे. ते फक्त निराधार गोष्टी बोलतात. केंद्र सरकार राज्यांना लस पाठवत नाही. केंद्राने राज्यांसाठी लस घ्याव्यात आणि सर्वांना मोफत द्याव्यात', असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या.
अलप्पन बंडोपाध्याय यांच्या नियुक्तीवर ममतांची प्रतिक्रिया...
पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव अलापन बंद्योपाध्याय यांना कारणे दाखवा नोटीसवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रतिक्रिया दिली. अलप्पन बंदोपाध्याय निवृत्त झाले आहेत. सरकार नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहील, असे त्या म्हणाल्या. पंतप्रधांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मुख्य सचिव अलप्पन बंडोपाध्याय उशीरा पोहचले होते. त्यानंतर केंद्राने बंडोपाध्याय यांना तात्काळ मुख्य सचिव पदावरुन हटवून त्यांना दिल्लीत बोलावले होते. बंड्योपाध्याय हे 31 मे रोजी निवृत्त होणार होते. परंतु त्यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, मुदतवाढ नाकारत त्यांनी निवृत्ती घेतली. त्यानंतर ममता बॅनर्जींनी त्यांची थेट मुख्य सल्लागारपदी नियुक्ती केली. बंदोपाध्याय यांची मुख्य सल्लागारपदी नियुक्त करण्याच्या ममता बॅनर्जी यांच्या निर्णयामुळे आता केंद्र सरकारविरूध्द ममता बॅनर्जी हा वाद आणखी वाढला आहे.
बंद्योपाध्याय यांना केंद्राची नोटीस
केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालचे माजी मुख्य सचिव अलप्पन बंद्योपाध्याय यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कडक तरतूदीखाली ही नोटीस बजावण्यात आली आहे. याअतंर्गत दोन वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सोमवारी बंद्योपाध्याय यांच्या सेवानिवृत्तीची घोषणा केल्याच्या काही तासांनी ही नोटीस त्यांना बजावण्यात आली आहे. 2005 च्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या कलम 51-बीचे उल्लंघन केल्याबद्दल केंद्र सरकारने बंद्योपाध्याय यांना ही नोटीस बजावली आहे. बंद्योपाध्याय यांनी सरकारच्या वैध मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यास नकार दिल्याचे केंद्राने म्हटलं आहे. बंदोपाध्याय यांना तीन दिवसांत नोटिसाला उत्तर देण्यास सांगितले आहे.