कोलकाता : येत्या २२ जानेवारीला अयोध्येत भव्य राम मंदिराचं उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी सचिन तेंडुलकर, अमिताभ बच्चन, विराट कोहली, मुकेश अंबानी यांच्यासह अनेक व्हीव्हीआयपींना निमंत्रण देण्यात आलंय.
ममता बॅनर्जी उपस्थित राहणार का : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही याबाबत सस्पेंस होता. आता हा सस्पेंस दूर झाला आहे. ममता बॅनर्जी यांनी या कार्यक्रमाला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. मात्र, त्यांच्या अनुपस्थितीचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही. यावर ममता बॅनर्जी मौन बाळगून आहेत. याबाबत त्या अधिकृतपणे कुठेही बोललेल्या नाहीत. मात्र, राम मंदिराच्या उद्घाटनाला ममता बॅनर्जी उपस्थित राहणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
काय कारण आहे : विशेष म्हणजे, पक्षाचे नेते यावर बोलण्यास तयार नाहीत. पक्षाच्या एका नेत्यानं बुधवारी 'ईटीव्ही भारत'ला सांगितलं की, "ममता बॅनर्जी अयोध्येतील कार्यक्रमाला उपस्थित राहणार नाहीत. तसेच कार्यक्रमादरम्यान पक्षाचा इतर कोणताही कोणताही नेता पक्षाचं प्रतिनिधित्व करणार नाही." तृणमूल काँग्रेसच्या एका सूत्रानं सांगितलं की, ममता बॅनर्जी कामाच्या प्रचंड ताणामुळे राम मंदिर उद्घाटन सोहळ्याला उपस्थित राहू शकत नाहीत. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या नेहमी म्हणतात की धर्म राजकारणात मिसळू शकत नाही.
सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण : राम मंदिराच्या उद्घाटनासाठी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना अयोध्येत आमंत्रित करण्यात आलंय. मंदिर प्रशासनानं राहुल गांधी, सोनिया गांधी, सीताराम येचुरी आणि मल्लिकार्जुन खरगे यांसारख्या विरोधी नेत्यांनाही आमंत्रित केलं आहे. मात्र राममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला आपण जाणार नसल्याचं विरोधी पक्षातील अनेक जण सांगत आहेत.
माकपही उपस्थित राहणार नाही : तृणमूल काँग्रेसशिवाय, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानंही या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतलाय. सीपीएमच्या नेत्या वृंदा करात म्हणाल्या की, राजकारण आणि धर्म वेगळे केले पाहिजेत. जेव्हा धर्माचा वापर राजकीय शस्त्र म्हणून किंवा एखादी कल्पना किंवा अजेंडा पुढे नेण्यासाठी एक साधन म्हणून केला जातो, तेव्हा त्याचा आदर कमी होतो, असं त्यांनी सांगितलं.
हे वाचलंत का :