नवी दिल्ली: सूत्रांच्या माहितीनुसार, जेष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे किंवा अन्य कोणत्याही दलित चेहऱ्याला कॉंग्रेस पक्षाकडून पक्षाध्यक्षपदासाठीची उमेदवारी दिली जाऊ शकते. यांच संदर्भात खर्गे यांनी दिल्लीत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट घेतली (kharge met sonia gandhi). मात्र त्यांच्या उमेदवारीचा अंतिम निर्णय सोनिया गांधी ह्याच घेतील. खर्गे हे एकूण आठ वेळा आमदार, दोन वेळा लोकसभा आणि एक वेळ राज्यसभेचे खासदार राहिले आहेत. मात्र 2019 च्या लोकसभा निवडणूकीत त्यांचा पराभव झाला होता. ते कर्नाटकचे माजी प्रदेशाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्रीही राहिले आहेत.
अशोक गेहलोत शर्यतीतून बाहेर: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी गुरुवारी राज्यात काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक न घेतल्याबद्दल पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांची माफी मागितली आणि पक्षाध्यक्षपदाच्या शर्यतीपासून स्वतःला दूर केले (gehlot apologies to sonia). सोनिया गांधी यांची त्यांच्या निवासस्थानी '10 जनपथ' येथे भेट घेतल्यानंतर गेहलोत म्हणाले की, मी यापुढे अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार नाही आणि मी मुख्यमंत्रीपदी राहील की नाही याचा निर्णय काँग्रेस अध्यक्षाच घेतील. गेहलोत यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की, मी गेल्या 50 वर्षांपासून काँग्रेसचा निष्ठावान सैनिक राहिलो आहे. दोन दिवसांपूर्वी घडलेल्या घटनेने सर्वांनाच हादरवून सोडले आहे. मला होणारी वेदना फक्त मीच जाणू शकतो. संपूर्ण देशात संदेश गेला की मला मुख्यमंत्रीपदी राहायचे आहे, म्हणून हे सर्व घडत आहे मात्र दुर्दैवाने ठराव मंजूर होऊ शकला नाही, त्यामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. घडलेल्या घटनेबद्दल मी नेहमीच दुःखी राहीन. मी सोनियाजींची माफी मागितली आहे.
सचिन पायलट यांनी घेतली सोनिया गांधींची भेट: गेहलोत यांच्या सोनिया गांधींशी झालेल्या भेटीनंतर काही तासांतच त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी आणि राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलटही १० जनपथवर पोहोचले (sachin pilot met sonia gandhi). सोनिया गांधी यांची भेट घेतल्यानंतर पायलट म्हणाले की, राजस्थानमधील घडामोडींबाबत आपण आपल्या भावना आणि प्रतिक्रिया काँग्रेस अध्यक्षांना कळवल्या आहेत. सोनिया गांधी या बाबतीत सकारात्मक निर्णय घेतील अशी आशा आहे. राजस्थानशी संबंधित राजकीय घडामोडींदरम्यान काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले की, सोनिया गांधी राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाबाबत येत्या एक-दोन दिवसांत निर्णय घेतील. पक्षाच्या राजस्थान युनिटमध्ये पेच निर्माण झाल्यानंतर गेहलोत आणि पायलट यांनी सोनिया गांधी यांच्याशी ह्या भेटी घेतल्या.
कॉंग्रेस नेत्यांच्या बैठकींना उधाण: दरम्यान, काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी गेहलोत यांची जोधपूर हाऊस येथे भेट घेतली, तर वेणुगोपाल यांनी सकाळी सोनिया गांधी यांची भेट घेतली. दुसरीकडे काँग्रेसच्या शिस्तपालन कृती समितीचे प्रमुख ए के अँटनी यांनी समितीचे सदस्य सचिव तारिक अन्वर यांच्यासोबत केरळ भवन येथे बैठक घेतली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी चिदंबरम यांनी दिग्विजय सिंह यांची भेट घेतली. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जाहीर कार्यक्रमानुसार २२ सप्टेंबर रोजी अधिसूचना जारी करण्यात आली असून, उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत २४ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर अशी निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख ८ ऑक्टोबर आहे. एकापेक्षा जास्त उमेदवार असल्यास 17 ऑक्टोबरला मतदान होईल आणि 19 ऑक्टोबरला निकाल जाहीर केला जाईल.
राजस्थानमध्ये निर्माण झालेल्या राजकीय संकटाची छाया काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर पडली आहे. रविवारी संध्याकाळी जयपूरमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावण्यात आली होती, मात्र गेहलोत समर्थक आमदारांनी त्यात हजेरी लावली नाही. त्यामुळे गेहलोत यांच्या जवळच्या तीन नेत्यांवर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्यात आली होती. त्यानंतर काही वेळातच पक्षाच्या शिस्तपालन कृती समितीने त्यांना 'कारणे दाखवा नोटीस' बजावली होती.