हैदराबाद : यशवंतराव बळवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. ते भारताचे पाचवे उपपंतप्रधान देखील होते. यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे खंबीर नेते तसेच स्वातंत्र्यसैनिक, सहकारी नेते आणि समाजसेवक होते. 'सामान्य माणसाचा नेता' म्हणून ते लोकांमध्ये लोकप्रिय होते. यशवंतराव चव्हाण यांचा जन्म 12 मार्च 1914 रोजी, महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे बालपण भारताचा स्वातंत्र्यलढा पाहण्यात गेले, ज्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला.
भारताचे उपपंतप्रधान : यशवंतराव चव्हाण हे केवळ भारताचे उपपंतप्रधानच नव्हते, तर ते देशातील प्रमुख राजकारणी आणि केंद्र सरकारच्या महत्त्वाच्या खात्यांमध्ये यशस्वी मंत्री होते. शेतकऱ्यांच्या हितासाठी त्यांनी अनेक कामे केली. यशवंतराव चव्हाण यांनीही शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी सहकारी संस्था स्थापन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
राजकीय कारकीर्द : यशवंतराव चव्हाण पुण्यातून कायद्याची पदवी घेतली, त्यानंतर त्यांनी वकिलीतून कारकिर्दीला सुरुवात केली. 1932 च्या सविनय कायदेभंगाच्या आंदोलनादरम्यान ब्रिटीश पोलिसांनी त्यांना अटक केली, ज्यापासून त्यांच्या सार्वजनिक जीवनाची सुरुवात झाली. 1943 मध्ये 'भारत छोडो आंदोलनात' काही काळ भूमिगत राहून सातारा चळवळीला मदत करताना ते पुन्हा पकडले गेले.
असे होते राजकीय जीवन : तुरुंगातून सुटल्यानंतर यशवंतराव चव्हाण मुंबई विधानसभेचे सदस्य झाले. 1952 च्या निवडणुकीत यश मिळाल्यानंतर त्यांना मंत्रिमंडळात घेण्यात आले. त्यानंतर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. 1962 च्या चिनी आक्रमणाच्या वेळी कृष्ण मेनन यांना संरक्षण मंत्रीपद सोडावे लागले, तेव्हा यशवंतराव चव्हाण यांनी ते पद स्वीकारले. 1966 पर्यंत ते या पदावर होते. त्यानंतर त्यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत अनुक्रमे गृहमंत्री, अर्थमंत्री आणि परराष्ट्रमंत्री ही पदे भूषवली.
योगदान आजही महाराष्ट्राच्या स्मरणात : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे राजकीय गुरू मानले जातात. 25 नोव्हेंबर 1984 रोजी दिल्लीत त्यांचे निधन झाले. मात्र यशवंतराव चव्हाण यांचे विचार आणि वैचारिक वारसा आणि राज्याच्या विकासातील योगदान आजही महाराष्ट्राच्या स्मरणात आहे.