प्रयागराज (उत्तरप्रदेश) - अखिल भारतीय अखाडा परिषदचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह सोमवारी त्यांच्या मठातील बाघंबरी गादी असलेल्या खोलीत गळफास घेऊन असलेल्या स्थितीत आढळला. त्याचसोबत सहा ते सात पानांची सुसाईड नोट सुद्धा हाती लागली आहे. माहितीनुसार या नोटमध्ये त्यांनी आत्महत्येला शिष्य आनंद गिरी, आघा तिवारी आणि एकाला जबाबदार धरले आहे. तसेच मागील आठवड्यात सुद्धा त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची माहिती समोर येत आहे. शिवाय मरणानंतर आपल्या उत्तराधिकाऱ्याची देखील नोंद सुसाईड नोटमध्ये केली आहे.
महंत नरेंद्र गिरी यांना ओळणारे म्हणतात की, ते इतकी मोठी सुसाईड नोट लिहू शकत नाही. ते नेहमी पत्र लिहिण्यासाठी शिष्यांना सांगत आणि त्यावर हस्ताक्षर करीत. तर दुसरीकडे असेही म्हटले जाते की, त्यांनी ही नोट टप्प्याटप्प्याने लिहिली आहे.
आठवड्याभरापूर्वी केला आत्महत्येचा प्रयत्न -
महंत नरेंद्र गिरी यांनी 13 सप्टेंबरला आत्महत्येचा प्रयत्न केला असल्याचे समोर येत आहे. मात्र त्यांची हिम्मत झाली नाही. तसेच त्यांनी आत्महत्येच्या एका दिवसाअगोदर प्लॅस्टीकची दोरी मागवली होती, असे आश्रमातील लोकांनी सांगितले.
तीन दिवसाअगोदर आघा तिवारीसोबत झाला वाद -
सुत्रांच्या माहितीनुसार, महंत अनेक दिवसांपासून तणावात होते. मात्र त्यांच्या तणावाचे कारण कोणालाही कळू शकले नाही. तीन दिवसाअगोदर मंदिराचे मुख्य पुजारी राहिलेले आघा तिवारीसोबत वाद झाला होता. हा वाद तेथील उपस्थित लोकांनी शांत केला. त्यानंतर तिवारी यांना महंतांनी मठात जाण्यास सांगितले.
स्वामी आनंद गिरी पोलिसांच्या ताब्यात -
महंतांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. स्वामी आनंद गिरी यांना उत्तरप्रदेश पोलिसांनी उत्तराखंड येथून ताब्यात घेतले आहे. तसेच त्यांची चौकशी सुरू आहे. मात्र अजूनही त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याचे पुढे येत आहे.