रायपूर : साधारणपणे बासरी वाजवायची म्हटलं, की त्यामध्ये फुंकावं लागतं हे आपल्या सगळ्यांनाच माहितिये. मात्र, आज आम्ही तुम्हाला एक अशी बासरी दाखवणार आहोत जी वाजवण्यासाठी त्यामध्ये फुंकावे लागत नाही. याबाबत जाणून घेण्यासाठी आपण जाणार आहोत, छत्तीसगडच्या नारायणपूरमध्ये. याठिकाणी गढबेंगाल गावामध्ये ही बासरी तयार केली जाते.
गढबेंगाल गाव हे जिल्हा मुख्यालयापासून पाच किलोमीटर दूर आहे. इथं राहणारे पंडीराम मंडावी कित्येक वर्षांपासून बांबूच्या कलाकृती बनवतात, ज्यांमध्ये या बासरीचाही समावेश आहे. पंडीराम सांगतात, की त्यांनी लहानपणी आपल्या वडिलांना ही बासरी बनवताना पाहिलं होते. सुरुवातीला घरगुती वापरासाठी ही बासरी बनवली जात असत. त्यांचे वडील जेव्हा रात्री रानात राखण करण्यासाठी जात तेव्हा ही बासरी वाजवत, ज्यामुळे साप आणि इतर जंगली जनावरं पळून जात. त्यांचं पाहून गावातील इतर लोकांनीही ही बासरी मागण्यास सुरुवात केली, ज्यामुळे मग पंडीराम यांचे संपूर्ण कुटुंबच ही बासरी बनवू लागले. आज केवळ यांच्या गावातच नाही, तर विदेशातही ही बासरी लोकप्रिय झाली आहे.
कशी तयार होते ही बासरी?
पंडीराम मंडावी यांच्या मुलाने ही बासरी तयार करण्याची पूर्ण प्रक्रिया सांगितली आहे.
- एक बासरी बनवण्यासाठी दोन-अडीच फुटांच्या बांबूची गरज असते.
- करवतीचा वापर करुन या बांबूला नीट कापले जाते.
- स्टूलचा वापर करुन हा बांबू सोलला जातो.
- आऊटर लेअरने याला फिनिशिंग दिले जाते.
- लोखंडी सळईच्या सहाय्याने बांबूमध्ये छिद्र केले जाते.
- विविध साधनांच्या माध्यमातून पुढील प्रक्रिया केली जाते.
- बांबूवर डिझाईन बनवण्यासाठी चाकूचा वापर केला जातो.
- शेवटी कोळशाच्या एका भट्टीमध्ये ही बासरी टाकण्यात येते.
ही एक बासरी बनवण्यासाठी दोन ते तीन तासांचा कालावधी लागतो. मात्र एकदा यात पारंगत झालं, की केवळ तासाभरातही ही बासरी बनवता येऊ शकते.
इटली आणि रशियामध्ये आहे प्रसिद्ध..
पंडीराम सांगतात, की त्यांची ही बासरी अगदी विदेशातही प्रसिद्ध आहे. १९९९मध्ये इटलीला पोहोचलेली ही बासरी, तिथल्या स्थानिकांना अगदीच आवडली. २००० साली दिल्लीतील एका प्रदर्शनामध्येही ही बासरी दाखवण्यात आली होती. यानंतर या बासरीची मागणी चांगलीच वाढली. पंडीराम ही बासरी वाजवून दाखवण्यासाठी दोन वेळा इटली आणि एकदा रशियाला जाऊन आलेत.
वाढती मागणी..
पंडीराम मंडावी यांचे पुत्र बीरेंद्र प्रताप मंडावी सांगतात, की ते बांबूसोबतच दुसरे सुतारकामही करतात. मात्र, या बासरीला सर्वाधिक मागणी आहे. दिल्ली, कोलकाता, मुंबई याठिकाणच्या हस्तशिल्प विकास बोर्डाकडून परदेशात पाठवण्यासाठी वरचेवर या बासरीची मागणी केली जाते.
विदेशात हजार रुपयांपर्यंत मिळते किंमत..
भारतात या बासरीला ३०० रुपयांपर्यंत किंमत मिळते. मात्र परदेशात याची किंमत एक हजार रुपयांपर्यंत जाते असे मंडावी यांनी सांगितले. नवी दिल्लीमधील एका एक्सपोर्ट हाऊसने नुकतीच दोन हजार बासऱ्यांची ऑर्डर दिल्याचेही त्यांनी सांगितले.
मात्र, आता ही बासरी बनवणारे कारागीर अगदीच कमी प्रमाणात राहिले आहेत. नव्या पिढीच्या लोकांना ही बासरी बनवण्यात रस नाही. बांबूच्या वस्तू बनवणारे कारागीर मिळून जातात, मात्र बासरी बनवणारे मिळणे अवघड असल्याचे पंडीराम सांगतात. ही कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवून, तिला जिवंत ठेवण्याचे आवाहन त्यांनी प्रशासनाला केले आहे.
हेही वाचा : ओडिशातील चंद्रपूरचा लखपती 'ब्लॉगर'!