लखनौ - प्रसिद्ध शायर, कवी मुनव्वर राणा यांच्याविरोधात उत्तर प्रदेशातील हजरतगंज येथे गुन्हा दाखल झाला आहे. फ्रान्सप्रकरणी राणा यांनी वक्तव्य केले होते. यानंतर राणा यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याचे समजते. पोलीस दीपक पांडे यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मुनव्वर यांच्या वक्तव्याने सामाजिक सौहार्द बिघडले असल्याचा दावा तक्रारकर्त्याने केला आहे.
![मुनव्वर राणा यांनी फ्रान्सप्रकरणी मत व्यक्त केले आहे.](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/up-luc-05-case-filed-against-munnwar-rana-dry-7204009_02112020132101_0211f_1604303461_729.jpg)
व्यंगचित्र हे प्रेषित मोहंमद आणि इस्लामचा अवमान करणारे होते. फ्रान्समधील लोकांची प्रतिक्रिया साहजिक होती. मी त्याठिकाणी असतो तर कदाचित मीसुद्धा तसाच वागलो असतो, असेही राणा म्हणाले. मी सदर प्रकरणात न्यायालयीन लढाई लढणार असल्याचेही राणा यांनी सांगितले.
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्या व्यंगचित्रानंतर वाद -
फ्रान्समधील एका शिक्षकाने वर्गात शिकवत असताना प्रेषित मोहम्मद पैगंबर यांचे व्यंगचित्र दाखविले होते. त्यानंतर मुस्लीम कट्टरतावाद्याने या शिक्षकाचा भररस्त्यात शिरच्छेद केला. या घटनेचे संपूर्ण देशात पडसाद उमटले होते. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष एम्यॅन्युअल मॅक्रान यांनी या घटनेचा कठोर शब्दांत निषेध केला. मुस्लीम धर्माबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांच्यावर टीका होत आहे. अनेक मुस्लीम देशांनी फ्रेंच मालावर बहिष्कार घालण्याची हाक दिली. पाकिस्तान, बांगलादेश, कतार या देशांसह अनेक देशांत आंदोलने झाले. शिक्षकाच्या हत्येनंतर फ्रान्स पोलिसांनी देशातील कट्टरतावाद्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शंभरपेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले.
काय म्हणाले होते फ्रान्सचे राष्टाध्यक्ष?
व्यंगचित्र वर्गात दाखविल्याप्रकरणी मॅक्रान यांनी माफी मागण्यास नकार दिला. तसेच जगभरात मुस्लीम धर्म संकटात असल्याचे ते म्हणाले. कट्टरतावाद्यांविरोधात लढण्यासाठी उपाययोजना करण्याची त्यांनी घोषणा केली. धर्मनिरपेक्षता फ्रान्सचा मूळ गाभा असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यानंतर मुस्लीम देशांतून त्यांच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. मॅक्रान यांनी व्यंगचित्र काढण्याच्या कृतीचे समर्थन केले.
फ्रान्समध्ये चाकूहल्ला -
फ्रान्समध्ये काल (गुरुवार) झालेल्या चाकू हल्ल्यात तीन व्यक्तींचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले. देशाच्या दक्षिण भागातील नीस शहरात एका चर्चजवळ ही घटना घडली. फ्रान्समधील शिक्षकाचा शिरच्छेद केल्यानंतर संपूर्ण फ्रान्समध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर काल पुन्हा चाकूहल्ल्याची घटना घडली. या हल्ल्यामागे कट्टरतावादी किंवा दहशतवादी आहेत का? या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत.