नवी दिल्ली: कर्नाटकचे ज्येष्ठ भाजप नेते केएस ईश्वरप्पा यांनी मंगळवारी पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत लढणार नसल्याचे सांगितले. निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेत असल्याचे ते म्हणाले. कन्नडमध्ये लिहिलेल्या त्यांच्या संक्षिप्त पत्रात, ज्येष्ठ आमदार आणि माजी उपमुख्यमंत्री ईश्वरप्पा यांनी सांगितले की, त्यांचा निर्णय स्वतःच्या इच्छेने घेतला आहे. आपल्या वक्तव्यांमुळे आणि त्यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांमुळे ते अनेकदा वादात सापडले आहेत.
मुलासाठी लॉबिंग सुरु: मिळालेल्या माहितीनुसार, ईश्वरप्पा जूनमध्ये 75 वर्षांचे होतील. ईश्वरप्पा आणि येडियुरप्पा हे समकालीन आहेत. सूत्रांनी सांगितले की, येडियुरप्पा यांना निवडणुकीच्या राजकारणात पुढे जाण्याची संधी नाकारण्यात आली असताना, ईश्वरप्पा यांनाही संधी दिली जाणार नाही, असे पक्षाचे मत आहे. ईश्वरप्पा यांनी तिकिटासाठी मुलगा कांतेश यांची लॉबिंग सुरू केली आहे. ईश्वरप्पा शिवमोग्गा शहर विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी राजकीय दिग्गज के.एच. श्रीनिवास यांचा पराभव करून राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली.
द्यावा लागला होता राजीनामा: उपमुख्यमंत्री म्हणूनही ईश्वरप्पा यांनी काम पाहिले. कंत्राटदार आणि भाजप नेते संतोष पाटील यांच्या आत्महत्येनंतर ईश्वरप्पा यांना मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या मंत्रिमंडळाचा राजीनामा द्यावा लागला होता. पाटील यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये ईश्वरप्पा यांच्या वागणुकीला जबाबदार धरले आहे. मात्र, त्यानंतरच्या तपासात त्याला क्लीन चिट मिळाली. क्लीन चिट मिळूनही ईश्वरप्पा मंत्रिमंडळात परतले नाहीत.
धनंजय यांना मिळू शकते तिकीट: त्यांच्या सेवांचा उपयोग संघटनात्मक कामांसाठी करण्याचा पक्ष विचार करत आहे. येडियुरप्पा यांच्या जवळचे स्थानिक नेते अयानूर मंजुनाथ हे तिकीटाचे दावेदार आहेत. समाजसेवक, साधनसंपन्न व्यक्ती आणि संघ परिवाराच्या जवळचे धनंजय यांना तिकीट मिळू शकते, असे पक्षाच्या सूत्रांनी सांगितले. भाजपने 224 सदस्यीय विधानसभेसाठी उमेदवारांची पहिली यादी अद्याप जाहीर केलेली नाही.
पहिली यादी लवकरच: कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोमवारी सांगितले होते की, 10 मे रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी भाजप उमेदवारांची पहिली यादी मंगळवारी किंवा बुधवारी जाहीर केली जाईल. यादी अंतिम करण्याबाबत कोणताही संभ्रम नसल्याचे ते म्हणाले होते. कदाचित पहिली यादी उद्या किंवा परवा जाहीर होईल. बोम्मई यांनी दिल्लीत पत्रकारांना सांगितले की, आज संध्याकाळी ते रिलीज होण्याची शक्यता आहे, परंतु अजून चर्चा होणे बाकी असल्याने ते मंगळवारी किंवा बुधवारी रिलीज होऊ शकते.