बंगळुरू - भाजपने पुन्हा एकदा लिंगायत आमदारांची मुख्यमंत्रिपदी निवड केली आहे. बसवराज बोम्माई यांची भाजपने कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी निवड केली आहे.
भाजपच्या आमदारांची मंगळवारी बैठक झाली. या बैठकीत बसवराज बोम्माई यांचे नाव मुख्यमंत्रिपदासाठी निश्चित करण्यात आले. बसवराज हे बी. एस. येडीयुराप्पा यांच्या जवळचे मानले जातात. ते जनता परिवारामधील आहेत. त्यांचे वडील एस. आर. बोम्माई यांनीही कर्नाटकचे मुख्यमंत्रीपद भूषविले आहे. भाजप आमदारांच्या बैठकीला पक्षाकडून निरीक्षक म्हणून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय मंत्री जी. कृष्णन रेड्डी आणि कर्नाटकचे भाजप प्रभारी अर्जून सिंह उपस्थित होते.
हेही वाचा-बसवराज बोम्माई हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री
कोण आहेत बसवराज बोम्माई?
बसवराज बोम्माई यांचा 28 जानेवारी 1960 ला जन्म झाला. ते सादारा लिंगायत समुदायामधील आहेत. बसवराज बोम्माई हे भाजपमध्ये 2008 ला सामील झाले. तेव्हापासून त्यांनी पक्षात उत्तरोत्तर प्रगती केली आहे. यापूर्वी त्यांनी जलसंपदा मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. ते व्यवसायाने अभियंते आहेत. त्यांनी टाटा ग्रुपमध्ये करियरची सुरुवात केली होती. ते दोन वेळा विधानपरिषद आमदार आणि तीनवेळा हावेरीतील शिगगगावमधून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
हेही वाचा-राज कुद्रांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश
येडीयुराप्पा यांनी सोमवारी दिला राजीनामा
गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री बीएस येदीयुरप्पा यांच्या राजीनामाच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यांनी सोमवारी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. मुख्यमंत्री येदियुरप्पा यांनी राज्यपाल थावरचंद गेहलोत यांची भेट घेत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा राज्यपालांना सुपूर्द केला. राज्यपालांनी येदियुरप्पांचा राजीनामा स्विकारला असून त्याबाबतचे पत्रही जारी केले होते.