तिरुअनंतपुरम Kerala Blast : केरळमध्ये रविवारी ज्या प्रार्थना गृहावर हल्ला झाला, ते गेल्या अनेक वर्षांपासून वादग्रस्त आहे. या प्रार्थना गृहाचा इतिहासही फार विचित्र आहे. येथे प्रार्थना करणारे लोक ख्रिश्चन धर्मावर विश्वास ठेवतात, परंतु ते येशू ख्रिस्ताला देव मानत नाहीत. ते यहोवाचे साक्षीदार म्हणून ओळखले जातात.
ख्रिस्ती धर्मापेक्षा वेगळे विचार : यहोवाचे साक्षीदार प्रामुख्याने ख्रिश्चन असले तरी त्यांचे विचार मुख्य प्रवाहातील ख्रिस्ती धर्मापेक्षा वेगळे आहेत. या पंथाची स्थापना अमेरिकन बायबल अभ्यासक चार्ल्स टेझ रसेल यांनी केली होती. सुरुवातीला यहोवा बायबलचे विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे. त्यांचा विश्वास आहे की, संपूर्ण जगात 'यहोवा' हा एकमेव देव आहे. जगभरात त्यांच्या अनुयायांच्या संख्या जवळपास दोन कोटींच्या आसपास आहे.
येशू ख्रिस्ताला देव मानत नाहीत : मुख्य प्रवाहातील ख्रिश्चन अनुयायी ट्रिनिटीवर विश्वास ठेवतात. तर यहोवांच्या मते, येशू ख्रिस्त हा देव नव्हता, तर तो 'देवाचा संदेशवाहक' होता. त्यांचा विश्वास आहे की, त्यांचा देव (यहोवा) स्वर्गातून पृथ्वीवर राज्य करतो आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करतो. यहोवांच्या विश्वासांनुसार, जेव्हा तुम्ही तुमच्या पापांचा नाश कराल, तेव्हा देव तुम्हाला सर्व अडथळ्यांपासून मुक्त करेल आणि मरण पावलेल्या चांगल्या लोकांना परत बोलावेल. यहोवा मुख्य प्रवाहातील ख्रिश्चनांप्रमाणे कोणत्याही प्रकारचं क्रॉस, मूर्ती किंवा चिन्हाची पूजा करत नाही.
अनेक देशांमध्ये बंदी आहे : यहोवांचा विश्वास प्रामुख्याने बायबलवर आधारित आहे. तरीही ते सिद्धांतवादी नाहीत. ते म्हणतात की, बहुतेक बायबल लाक्षणिक भाषेत लिहिलेलं आहे, त्यामुळे त्याचं अचूक पालन करण्याची गरज नाही. ते राजकीयदृष्ट्या तटस्थ आहेत. ते राष्ट्रध्वजाला वंदन करत नाहीत, तसेच राष्ट्रगीतही गात नाहीत. त्यांचा सैन्य सेवेवर विश्वास नाही. त्यांच्या या वादग्रस्त समजुतीमुळे जगातील अनेक देशांनी त्यांच्यावर निर्बंध लादले आहेत. अमेरिकेतही त्यांच्यावर बंदी आहे.
भारतात कधी आले : असं मानलं जातं की, हे लोक १९०५ मध्ये केरळमध्ये धर्माचा प्रचार करण्यासाठी आले होते. टीसी रसेल यांनी १९११ मध्ये रसालपुरम येथे पहिलं प्रवचन दिलं. एका अंदाजानुसार, केरळमध्ये सुमारे १५ हजार यहोवांचं वास्तव्य आहे. ते प्रामुख्याने केरळच्या मल्लापल्ली, मीनाडम, पंपाडी, वकातनम, कांगजा, आर्यकुन्नम आणि पुथुपल्ली येथे राहतात. ते वर्षातून तीन वेळा अधिवेशनाचं आयोजन करतात. ते २०० ठिकाणी ऑपरेट करतात. ते ना ख्रिसमस, ना इस्टर, ना येशू ख्रिस्ताचा वाढदिवस, कोणताच सण साजरा करत नाहीत.
हेही वाचा :