एर्नाकुलम Kerala Blast : केरळमधील एर्नाकुलमच्या प्रार्थना स्थळात झालेल्या बॉम्बस्फोटातील आरोपी ४८ वर्षीय डॉमिनिक मार्टिन हा मूळचा कोची कदवंतरा एलमकुलमचा रहिवासी आहे. सध्या तो आपल्या कुटुंबासह थम्मनम येथे भाड्याच्या घरात राहतो. मार्टिन यानं दीर्घकाळ यहोवाच्या साक्षीदारांसोबत सेवा केली असून तो बायबलच्या अभ्यासात सक्रिय होता. त्यानं इंग्लिश भाषेचा ट्रेनर म्हणूनही काम केलंय.
स्फोटाची योजना का आखली : आखाती देशात बराच काळ काम करणारा डॉमिनिक मार्टिन महिनाभरापूर्वीच मायदेशी परतला होता. तो पत्नी आणि मुलीसह थम्मनम येथे भाड्याच्या घरात राहत होता. मिळालेल्या माहितीनुसार, मार्टिननं यहोवाच्या साक्षीदारांबद्दल असलेल्या द्वेषामुळे स्फोटाची योजना आखली. हे बॉम्बस्फोट आपण एकट्यानंच केल्याचं मार्टिननं पोलिसांना सांगितलं.
अशा प्रकारे केले बॉम्बस्फोट : तपासादरम्यान पोलिसांना स्फोटांशी संबंधित माहिती आणि वैज्ञानिक पुरावे मिळाले. यावरून हा स्फोट मार्टिननेच घडवून आणला असल्याची पुष्टी झाली. मार्टिनचा यहोवांसोबत बऱ्याच काळापासून वाद सुरू होता. यातूनच त्यानं हा स्फोट घडवून आणल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यानं सहा महिने आधीच स्फोटाची तयारी सुरू केली होती. मार्टिननं इंटरनेटद्वारे बॉम्ब कसा बनवायचा हे शिकून घेतलं. तो बऱ्याच दिवसांपासून इंटरनेटवर बॉम्ब बनवण्याबाबत सर्च करत होता. स्फोटासाठीच्या साहित्याची ऑनलाइन व्यवस्था करण्यात आली. तर काही टूल किट स्थानिक पातळीवर खरेदी करण्यात आल्या. रिमोट कंट्रोलचा वापर करून हा स्फोट घडवून आणण्यात आला. डॉमिनिक मार्टिनच्या मोबाईलवरून यासंबंधीचं फुटेज सापडलं आहे.
स्फोटानंतर फेसबुकवर व्हिडिओ टाकला : मार्टिन सकाळी ६ वाजता घरातून बाहेर पडला. सुमारे ९.४० वाजता तो कलामासेरी मेडिकल कॉलेजजवळील कन्व्हेन्शन सेंटरला पोहोचला. तो स्कूटरवर तेथे आला होता. त्यानं दोन आयईडी बॉक्समध्ये स्फोटकं ठेवली. यानंतर त्यानं बॉम्ब आत पाठवला आणि थोड्याच अंतरावरून रिमोटच्या सहाय्यानं स्फोट केला. स्फोटाच्या वेळी तो सभागृहातंच होता. स्फोटानंतर तो तेथून पळून गेला. घरी पोहोचल्यानंतर त्यानं फेसबुकवर एक व्हिडिओ टाकला आणि नंतर बाईकवर कोडकरा पोलीस ठाणं गाठून दुपारी दीडच्या सुमारास आत्मसमर्पण केलं.
व्हिडिओमध्ये मार्टिन काय म्हणाला : मार्टिननं त्याच्या फेसबुक व्हिडिओमध्ये म्हटलं आहे की, 'माझं नाव मार्टिन आहे. तुम्हा सर्वांना नुकत्याचं घडलेल्या घडामोडी माहित असतील. यहोवाच्या साक्षीदारांच्या एका प्रार्थना स्थळी बॉम्बस्फोट झाला. त्याचे गंभीर परिणाम झाले. नेमकं काय झालं ते माहीत नाही, पण ते झालं. याची पूर्ण जबाबदारी मी घेतो. मीच स्फोट घडवून आणला. हा बॉम्ब मी का फोडला हे तुम्हाला समजावं म्हणून हा व्हिडिओ बनवला जात आहे.'
आपल्या निर्णयाचं समर्थन केलं : तो पुढे म्हणाला की, 'मी १६ वर्षांपासून या चळवळीचा भाग आहे. सुरुवातीला याला फारसं गांभीर्यानं घेतलं गेलं नाही. मात्र सहा वर्षांनंतर ही चळवळ चुकीच्या मार्गावर चालू लागली. त्यातून जे काही शिकवलं जातं तो देशद्रोह असल्याचं लक्षात आल्यानं मी त्यांना हे सर्व दुरुस्त करण्यास सांगितलं. पण ते दुरुस्त करायला कोणीही तयार नव्हतं. मला दुसरा मार्ग सापडत नव्हता.' मार्टिन पुढे म्हणाला की, 'मला असा निर्णय घ्यावा लागला कारण हे आंदोलन देशासाठी धोकादायक आहे हे मला समजलं होतं. हे आंदोलन आपल्या देशासाठी आवश्यक नाही. दुसरी गोष्ट म्हणजे आता मी पोलीस ठाण्यात हजर होणार आहे आणि मला शोधण्याची गरज नाही.'
यूएपीएसह एफआयआर नोंदवला : पोलिसांनी या प्रकरणी आरोपीविरुद्ध यूएपीएसह गंभीर कलमांखाली एफआयआर नोंदवला आहे. मार्टिननं यहोवांच्या साक्षीदारांसोबत काम केल्याचा दावा संस्थेनं नाकारला. अशी व्यक्ती त्यांची सभासद नाही, असं उत्तर संस्थेच्या पीआरओनं दिलं. मात्र पीआरओनं असंही सांगितलं की, या नावाची एक व्यक्ती ४ वर्षांपूर्वी बायबल अभ्यासासाठी आली होती. मार्टिनचा व्हिडिओ मेसेज व्हायरल झाल्यानंतर लगेचच फेसबुक पेजही गायब झालं. दरम्यान, कन्व्हेन्शन हॉलमध्ये झालेल्या स्फोटात भाजलेल्या महिलेची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही.
हेही वाचा :