बेंगळुरू: अभिनेता शक्ती कपूरचा मुलगा सिद्धांत कपूर याच्या ड्रग्ज प्रकरणाचा तपास करत असलेले कर्नाटक पोलीस पुढील चौकशीसाठी त्याला समन्स पाठवणार आहेत, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा भाऊ असलेल्या सिद्धांतला एका आठवड्यात पुढील चौकशीसाठी पोलिसांसमोर हजर राहण्यास सांगितले जाईल, असे पोलिसांनी सांगितले. ही नोटीस व्हॉट्सअॅपवर तसेच रजिस्टर पोस्टद्वारे पाठवली जाईल, असे पोलीस सूत्रांनी बुधवारी सांगितले.
ड्रिंकमध्ये अंमली पदार्थ - सिद्धांतने आधी दिलेल्या माहितीवरुन त्याची पुढील चौकशी केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. त्याच्या ड्रिंकमध्ये अंमली पदार्थ होते आणि त्याला याबद्दल काहीही माहिती नाही असे तो म्हणाला होता. कर्नाटक पोलिसांनी जूनमध्ये बेंगळुरूमध्ये ड्रग्ज सेवन केल्याप्रकरणी सिद्धांत कपूरला अटक केली होती. हलसूरू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पहाटेच्या सुमारास पार्टी करत असताना त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी माहिती मिळताच अचानक छापा टाकून 35 जणांना ताब्यात घेतले होते.
ड्रग्ज सेवन केल्याची पुष्टी - 25 सदस्यीय पोलिस पथकाने छापे टाकून सिद्धांत कपूर आणि इतरांना ताब्यात घेतले होते. वैद्यकीय चाचण्यांमध्ये सिद्धांत कपूरने ड्रग्ज सेवन केल्याची पुष्टी झाली होती. पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर जामिनावर सोडले आहे. चौकशीदरम्यान, त्याने सांगितले होते की, त्याला कोणीतरी अंमली पदार्थांनी भरलेले पाणी आणि सिगारेट दिली होती. पुढील तपास सुरू आहे.