हैदराबाद - आज कारगिलचे विजय दिवस. या दिवशी कारगीलच्या लढाईत ( Kargil Vijay Diwas 2022 ) हुतात्मा झालेल्या जवानांचे स्मरण केले जाते. कारगिलच्या युद्धात भारतीय जवानांनी ( Indian Army defeated Pakistan in Kargil War ) पाकिस्तानी सैन्याला तोंडघशी पाडले होते. ही लढाई कठीण होती. मात्र, जवानांच्या शौर्याने कारगिलमध्ये विजयी झेंडा फडकला. पाकिस्तान सोबत भारताची आतापर्यंत चार युद्धे झाली आहेत. यातील 1971 च्या लढाईत पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते. यानंतरही पाकिस्तानच्या कुरापती थांबल्या नाही. 1999 साली कारगिलचे युद्ध घडले. पाकिस्तानी सैन्याने भारतीय हद्दीत घुसखोरी केली होती, तिला भारतीय सैन्याने चौख प्रत्युत्तर देत विजय मिळवला. कारगिल युद्धाची सुरुवात कशी झाली? भारतीय सैन्याने पाकिस्तानचा कट कसा हाणून पाडला? याबाबत आज आपण जाणून घेऊया.
हेही वाचा - Kargil Vijaya Diwas : कारगील विजय दिवसाच्या निमित्ताने श्रीनगरमध्ये भव्य दुचाकी रॅली
जवानांनी अशक्य ते शक्य केले - 14 ऑगस्ट 1947 ला आस्तित्वात आलेल्या पाकिस्तानसोबत भारताची आतापर्यंत चार युद्धे झाली आहेत. यात पहिले युद्ध 1947 ला झाले होते. याला काश्मीर युद्धही म्हटले जाते. दुसरे युद्ध झाले 1965 मध्ये, तिसरे युद्ध 1971 मध्ये झाले. या युद्धातून पाकिस्तानचे दोन तुकडे झाले होते आणि बांगलादेशची निर्मिती झाली होती. चौथे युद्ध होते कारगिलचे. नेहमीच नापाक कारवाया करणाऱ्या पाकिस्तानला 26 जुलै 1999 रोजी तोंडघशी पाडत भारताने पराभवाची धूळ चारली होती. कारगिलच्या लढाईत भारताने मिळवलेला विजय 'कारगिल विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. ही लढाई फार कठीण होती, मात्र जवानांनी अशक्य ते शक्य केले होते.
या अमानुष घटनेनंतर कारगिल युद्धाची ठिणगी पडली - माहितीनुसार, 3 मे 1999 ला पहिल्यांदा पाकिस्तानी सैन्यांना गरखोन गावातील ताशी नामग्याल नावाच्या गुराख्याने पाहिले होते. भारतीय सीमेजवळ गुराख्याला पाकिस्तानी सैन्याचे बंकर दिसले. पाकिस्तानी सैन्यांनी नियंत्रण रेषा पार केल्याची माहिती गुराख्याने भारतीय जवानांना दिली. गुराख्याच्या माहितीनुसार, भारतीय सैन्याने सीमा रेषेची पाहणी केल्यानंतर पाकिस्तानचे कुटील कारस्थान उघड झाले. भारतीय लष्कराने 5 मे रोजी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी गस्ती पथक पाठवले. पथक गस्त घालत असतानाच अचानकपणे सहा जवानांसह कॅप्टन सौरभ कालीया गायब झाले. काही दिवसांनी भारतीय सेनेला कॅप्टन कालिया यांच्यासह सहा जवानांचे मृतदेह छिन्न-विछिन्न अवस्थेत सापडले. पाकिस्तानी सैन्याच्या या भ्याड कृत्यामुळे देशभरात संताप उसळला. या अमानुष घटनेनंतर कारगिल युद्धाची ठिणगी पडली.
तेव्हा भारताला हा मोठा कट असल्याचे समजले - पाकिस्तानी घुसखोरीची घटना समोर येण्याआधीपासूनच पाकचे तेव्हाचे लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ भारतावर हल्ला करण्याची योजना आखत होते. त्यासाठी त्यांनी सैनिकांची एक तुकडी बनवली होती. याच तुकडीने काही चौक्यांवर ताबा मिळवला होता. पाकिस्तानी सैन्याची घुसखोरी लक्षात आल्यानंतर 20 मे पर्यंत भारत आणि पाकिस्तानी सैन्यादरम्यान छोट्या-मोठ्या चकमकी झाल्या. पाक सैनिक उंचीवर असल्याने भारतीय सैनिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे, भारतीय जवानांनी रात्रीच्यावेळी चढाया केल्या. पाकिस्तानकडून भारतीय सैन्यांवर हल्ले होत असल्याचे दिसताच, हा एक मोठा कट असल्याचे भारताच्या लक्षात आले. तेव्हा भारतीय संरक्षण मंत्री जॉर्ज फर्नांडिस यांनी आपला रशियाचा दौरा रद्द केला आणि 'ऑपरेशन विजय'ची तयारी सुरू केली.
पाकिस्तानचे नियोजन आणि उद्दीष्टे - 1986 मध्ये, पाकिस्तानी सैन्याने Tupac नावाचे ऑपरेशन सुरू केले होते. यात पाकिस्तानने भारतावर आक्रमण करणाऱ्याच्या वेगवेगळ्या शक्यता तपासल्या होत्या. सुमारे एक दशक नंतर, 1998 मध्ये, जनरल परवेझ मुशर्रफ पाकिस्तानचे लष्करप्रमुख बनले. तेव्हा त्यांनी ऑपरेशन Tupac ची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय राजमार्ग तोडून उंच शिखरावरील चौक्यावर ताबा मिळवून वाटाघाटी करता येईल, अशी परिस्थिती त्यांना निर्माण करायची होती. अत्यंत महत्वाचा राष्ट्रीय श्रीनगर-लेह राजमार्ग हा लडाखला कारगिलशी आणि देशाच्या इतर बाकी भागांशी जोडतो. हा महामार्ग लष्करासाठी खूप महत्त्वाचा होता. हा महामार्ग तोडण्याचा आणि टायगर हिलवर ताबा मिळवण्याचा पाकिस्तानाचा हेतू होता.
पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केल्या चौक्या - पाकिस्तानच्या घुसखोरीनंतर भारताने एक पाऊल पुढे जात, राष्ट्रीय राजमार्गाजवळील तोलोलिंग चौकीवरून पाकिस्तानला हटवण्यासाठी चढाई केली. अखेर 12 जूनला भारतीय सैन्याने तोलोलिंग चौकीवर ताबा मिळवला. यानंतर लष्कराचे लक्ष्य होते, टायगर हिलवर. ग्रेनेडियर योगेंद्र सिंह यादव यांनी द टायगर हिल परत मिळवण्यात मोलाची कामगिरी केली. यादव यांच्या पथकाने 4 जुलै 1999 ला टायगर हिलवर तिरंगा फडकावला. टायगर हिल ताब्यात घेताना, योगेंद्र सिंह यांना गोळ्या लागल्या होत्या व त्यांनी 4 पाकिस्तानी सैनिकांना मारले होते. यामध्ये त्यांच्या दोन्ही पायांना गोळ्या लागल्या होत्या. तर त्याचे दोन सहकारी मारले गेले.
कारगिल युद्धात विजय प्राप्त करण्यासाठी टायगर हिल फार महत्त्वाची ठरली. तर बटालिक क्षेत्रामध्ये 9 जून 1999 ला यश मिळाले. त्यानंतर पॉईंट 4875, पॉईंट 5000, जुबार क्षेत्रात हल्ले केले. 7 जुलै 1999 ला भारताने या पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केल्या. पाॉईंट 4875 मधून राजमार्ग निशाण्यावर होता. ही चौकी शौर्याने युद्ध लढून परत मिळवली. तर काकसर हे हिवाळ्यात खाली पाहून त्यावर पाकिस्तानने ताबा मिळवला होता. यानंतर भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून ती चौकी मुक्त केली. या भागात भीषण युद्ध झाले. येथून पाकिस्तानी सैन्यांना भारतीय जवानांनी पळवून लावले. तर, खालूबार टॉप हा एक महत्त्वपूर्ण भाग होता. या क्षेत्रावर ताबा मिळवल्यानंतर संपूर्ण युद्धाचा रंगच बदलला असता. या क्षेत्रात भारतीय जवानांनी विरगाथा रचली. भारतीय सैन्याने टायगर हिल, तोतोलिंगसह इतर चौक्या परत मिळवल्या. कारगिल युद्धात तीन ऑपरेशन्सचा समावेश होता. ऑपरेशन विजय जे भारतीय सैन्याने केले होते. तर ऑपरेशन सफेद सागर हे भारतीय हवाई दलाने केले होते. आणि ऑपरेशन तलवार जे भारतीय नौदलाने केले होते.
ऑपरेशन सफेद सागर (ऑपरेशन व्हाइट सी) - ऑपरेशन सफेद सागर हे ऑपरेशन अशा वेळी सुरू करण्यात आले होते जेव्हा उंचीवर बसलेले पाकिस्तानी सैनिक थेट भारतीय सैनिकांना लक्ष्य करीत होते. मग वायूसेनेने पाकिस्तानी सैनिकांवर हवाई हल्ले केले आणि त्यांची ठिकाणे नष्ट केली. हे ऑपरेशन नसते तर कारगिलचा विजय कठीण होता. 8 मे रोजी कारगिल युद्ध सुरू झाल्यानंतर, हवाई दलाने 11 मेपासून भारतीय सैन्याला मदत करण्यास सुरवात केली होती. यावेळी कारगील गर्ल गुंजन सक्सेनाने मोठी भूमिका बजावली. या युद्धात भारताने बोफर्स गनही वापरण्याचा निर्णय घेतला. आकाशातून हवाई हल्ले आणि जमिनीवरून बोफोर्स तोफखानाच्या गोळ्यांनी पाकिस्तानी सैनिकांना पळ काढण्यास भाग पाडले.
ऑपरेशन तलवार - भारतीय नौदलाकडून ऑपरेशन तलवार राबण्यात आले. या अंतर्गत पाकिस्तानला कारगिल युद्धासाठी लागणारा तेल आणि इंधन पुरवठा होऊ नये म्हणून कराचीसह पाकिस्तानी बंदरांचे मार्ग रोखले गेले. तसेच, भारताने पाकिस्तानचा सागरी व्यापार मार्गही बंद केला. पाकिस्तानच्या बंदरातून येणारे रस्ते अडविण्यात आले. नौदलाच्या पूर्व आणि पश्चिम जहाजांनी उत्तर अरबी समुद्रावर गस्त वाढविली आणि कारगिल युद्धाच्या काळात नौदलाची सामान्य गस्तही खूप आक्रमक झाली होती. अरबी समुद्रावरून पाकिस्तानकडे जाणारा पुरवठा बंद करणे हा नौदलाचा उद्देश होता आणि त्याला यश आले होते.
आंतराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला उघडे पाडले - एकीकडे कारगील युद्धात जवान पाकिस्तानविरोधात लढत होते. तर दुसरीकडे भारताने आंतराष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रभावी मुत्सद्दीपणाद्वारे जगासमोर पाकिस्तनाचा चेहरा उघडकीस आणला. पाकिस्तानी कृती म्हणजे भारताच्या सार्वभौमत्वावर हल्ला असल्याचे भारताने म्हटले. युद्धाची सुरवात पाकिस्तानच्या आक्रमकतेमुळे झाली असून, पाकिस्तानकडून शिमला करारचे उल्लंघन झाल्याचे भारतीय राजनैतिकांनी आंतरराष्ट्रीय समुदायासमोर मांडले. जून अखेरीस, अमेरिकन सरकार, युरोपियन युनियन आणि जी - 8 या देशांनी पाकिस्तानला कारगीलमधून माघार घेण्यास सांगितले. असे न केल्यास निर्बंधांची धमकी दिली. विशेषत: अमेरिकेने कारगिलमधून माघार घेण्यासाठी पाकिस्तानवर दबाव टाकला.
परवेझ मुशर्रफ यांनी आपल्या ‘द लाइन ऑफ फायर’ या पुस्तकात कबूल केले, की भारताने जागतिक पातळीवर चतुराईने पाकिस्तानवर दबाव टाकण्यात यश मिळवले. पाकिस्तानला राजनैतिकरित्या अलग ठेवण्याच्या भारताच्या प्रयत्नानांनी काम केले. याचा पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर मोठा परिणाम झाला. कारगिल भागात जबरदस्त शेलिंग होत असतानाच पंतप्रधान वाजपेयी यांनी कारगिलला भेट दिली. यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन यांनी 15 जूनला पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांना कारगीलमधून बाहेर निघायला सांगितले होते.
कारगिल युद्धात दिलीप कुमार आणि नवाझ शरिफ यांचा रंजक किस्सा - कारगिल युद्ध सुरू झाल्यावर अटलबिहारी वाजपेयींनी शरीफ यांना फोन केला. एकीकडे लाहोरमध्ये जल्लोषात स्वागत होत असताना दुसरीकडे पाक सैन्य भारतीय हद्दीत घुसखोरी करत होते, असे विचारत वाजपेयींनी नाराजी व्यक्त केली. शरीफ यांनी या प्रकाराची आपल्याला काहीच माहिती नाही, लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांच्याशी चर्चा करून तुमच्याशी पुन्हा चर्चा करतो, असे शरीफ यांनी वाजपेयींना सांगितले. यानंतर वाजपेंयींनी एका व्यक्तीला तुमच्याशी बोलायचे आहे, असे शरीफ यांना सांगितले. ही व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार होते. दिलीप कुमार यांनी शरीफ यांना परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्याचे आवाहन केले. भारत - पाकमधील संबंधामुळे भारतातील मुसलमान भयग्रस्त झाले आहेत. त्यांना घरातून बाहेर पडायलाही भीती वाटते. भारत - पाकमधील शांतीपूर्ण संबंध समर्थक असताना तुमच्याकडून आम्हाला अशी आशा नाही, असेही दिलीपकुमार यांनी शरीफ यांना सुनावले होते.
‘ये दिल मांगे मोअर’ - कारगिल युद्धाचा विषय निघावा आणि कॅप्टन विक्रम बत्रा यांचा उल्लेख होणार नाही, हे अशक्य. कारगिलच्या या युद्धात विक्रम बत्रा यांनी महत्त्वपूर्ण योगदान देत देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. 7 जुलै 1999 या दिवशी युद्धभूमीवर भारतमातेच्या या सुपूत्राने अखेरचा श्वास घेतला. कॅप्टन विक्रम बत्रा यांनी कारगिलच्या पाच अत्यंत महत्त्वाच्या ठिकाणी तिरंगा फडकावण्यात महत्वाची भूमिका बजावली. विक्रम यांनी पॉईंट 5140 पाकिस्तानच्या ताब्यातून मुक्त केले. तेव्हा त्यांनी रेडिओवर आपल्या कमांड पोस्टला संदेश पाठवला. तो संदेश होता, "या तो मै तिरंगा फहराने के बाद वापस आऊंगा, या मै उसमे लिपटा हुआ वापस आऊंगा, लेकिन मै वापस आऊंगा- ‘ये दिल मांगे मोअर’. भारत सरकारने त्यांना मरणोत्तर परमवीर चक्र प्रदान केले.
कारगिल गर्ल - पहिल्या महिला फ्लाईट लेफ्टनंट गुंजन सक्सेना यांनी वयाच्या चोविसाव्या वर्षी कारगिलच्या युद्धभूमीवर कर्तृत्व गाजवले. गुंजन सक्सेना यांनी निर्भयपणे युद्ध क्षेत्रात चित्ता हेलिकॉप्टर उडवले. यादरम्यान, त्यांनी जखमी सैनिकांना द्रास आणि बटालिकच्या उंच टेकड्यांमधून उचलले आणि परत एका सुरक्षित ठिकाणी आणले. पाकिस्तानी सैनिक सातत्याने रॉकेट लाँचर आणि गोळ्यांनी हल्ला करत होते. गुंजन यांच्या विमानावरही एक क्षेपणास्त्र डागण्यात आले. परंतु, त्यांनी निशाणा हुकवला आणि निसटल्या. युद्धातील कामगिरी पाहता, गुंजन यांचा शौर्य चक्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यांच्या कौतुकास्पद कामगिरीनंतर त्यांना 'कारगिल गर्ल' म्हणून ओळखण्यात येते.
२६ जुलैला कारगिल युद्ध संपुष्टात आले. युद्धात भारताचे 490 जवान हुतात्मा झाले होते. तर, पाकिस्तानचेही 2700 हून अधिक सैन्य मारले गेले. पाकिस्तानने भारताला पराभूत करण्याची योजना बनवली असली तरीही भारताच्या वीर जवानांनी त्याच्या सर्वच योजनांवर पाणी फेरले. संपूर्ण जगासमोर पाकिस्तानची यामुळे नाचक्की झाली.
हेही वाचा - Kargil Vijay Diwas : कारगिल युद्धात सर्वात कमी वयाचे शहीद जवान, 'असा' होता मनजीत सिंग यांचा पराक्रम