कानपूर : येथील एका स्वातंत्र्य सैनिकाची कवटी तब्बल 166 वर्षांनंतर भारतात आणली जात आहे. या सैनिकाने 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांविरुद्ध लढा दिला होता. विशेष म्हणजे, त्यांची कवटी गेली अनेक वर्षे ब्रिटनमध्ये युद्ध निशाणी म्हणून ठेवण्यात आली होती.
1963 मध्ये लंडनमधील पबमध्ये कवटी सापडली : कानपूरचे सैनिक आलम बेग यांची कवटी 166 वर्षांनंतर भारतात आणण्यात वैज्ञानिकांना यश आले आहे. 1963 मध्ये लंडनमधील एका जोडप्याने स्थानिक पबमध्ये आलम बेग यांची कवटी पाहिली होती. त्या जोडप्याने लगेचच ती कवटी घेऊन जाण्याची इच्छा व्यक्त केली. जेव्हा त्यांना ती कवटी मिळाली तेव्हा कवटीच्या डोळ्यांजवळील छिद्रात एक कागद होता. यामध्ये आलम बेग यांची संपूर्ण माहिती लिहिली होती. त्यानंतर या जोडप्याने ब्रिटनमधील इतिहासकार प्रा. वॅगनर यांच्याशी संपर्क साधला. प्रा. वॅगनर यांनी कवटीवर गेली अनेक वर्षे संशोधन केले आणि आता संशोधनाच्या आधारे ही कवटी आलम बेग यांचीच असल्याचे सांगितले.
कवटीची डीएनए चाचणी होणार : याआधी चंदीगड विद्यापीठाचे प्राध्यापक जे एस सेहरावत यांनी या कवटीसाठी ब्रिटीश सरकार तसेच प्रा. वॅगनर यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर आता ही कवटी भारतात आणण्याचा मार्ग मोकळा झाला. गेल्या आठवड्यातच ही कवटी प्रा. सेहरावत यांच्यापर्यंत पोहोचली. आता ही कवटी प्रथम त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येईल. त्यानंतर तिच्या अंत्यसंस्काराची तयारी केली जाईल. दरम्यान, तिची डीएनए चाचणीदेखील होणार आहे, जेणेकरून इतर काही रहस्ये उघड होऊ शकतील.
कोण होते आलम बेग : आलम बेग 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात बंडखोर भारतीय सैनिकांचे नेतृत्व करत होते. युद्धात त्यांनी अनेक ब्रिटिश अधिकाऱ्यांची हत्या केली होती. नंतर इंग्रजांनी त्यांना कानपूरहून पकडले आणि तोफेच्या तोंडी दिले होते. यानंतर त्यांची कवटी अनेकवर्षे ब्रिटनमध्ये युद्ध निशाणी म्हणून ठेवण्यात आली होती. इतिहासकार प्रा. वॅगनर यांना आलम बेग यांची कवटी सापडली तेव्हा त्यात एक पत्र होते. त्यात लिहिले होते की, मृत्यूसमयी आलम बेग यांचे वय 32 वर्षे होते. त्यांची उंची 5 फूट 7 इंच होती. कॅस्टिलो नावाची एक व्यक्ती ही कवटी एका पबमध्ये ठेवून तेथेच विसरली होती. यानंतर कवटीवर केलेल्या संशोधनाच्या माध्यमातून आलम बेग यांची कहाणी सर्वांसमोर आली. आता शास्त्रज्ञ ही कवटी घेऊन त्यांच्या नातेवाईकांच्या डीएनएशी जुळवणार आहेत. यानंतर ही कवटी त्यांच्या मातृभूमीत दफन केली जाईल.
हेही वाचा :