बंगळुरू : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे प्रमुख एच. डी. देवेगौडा यांनी ममता बॅनर्जी यांच्यावरील हल्ल्याप्रकरणी कारवाईची मागणी केली आहे. अशा प्रकारच्या हल्ल्याबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी यावर त्वरीत कारवाई करण्याची मागणी केली.
यापुढे संयम पाळला जाईल अशी आशा..
"ममता बॅनर्जी यांच्या प्रकृतीबाबत मला चिंता आहे. त्या लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात या सदिच्छा. राजकारणामध्ये विजय-पराजय या साधारण गोष्टी असतात, मात्र लोकशाहीला अशा प्रकारच्या हिंसक घटनांमुळे धोका पोहोचतो. सर्वच बाजूंची इथून पुढे संयम पाळला जाईल अशी आशा आहे" असे मत देवेगौडा यांनी व्यक्त केले. ते हसनमध्ये माध्यमांशी बोलत होते.
पक्षांनी खालच्या स्तरावर येऊ नये..
महाशिवरात्रीच्या निमित्ताने त्यांनी आपल्या पत्नी चेन्नम्मा यांच्यासह हरदनहल्ली मंदिराला भेट दिली. त्यानंतर ते माध्यमांशी संवाद साधत होते. ते म्हणाले, की राजकारणामध्ये निवडणूक जिंकण्यासाठी म्हणून पक्षांनी अशा खालच्या स्तराला येऊ नये. पक्षांनी लोकांचे मत स्वीकारण्याची तयारी ठेवावी.
बुधवारी ममतांवर झाला होता हल्ला..
बुधवारी नंदीग्राममध्ये प्रचारासाठी आलेल्या ममतांना काही लोकांनी धक्का दिल्यामुळे त्या पडल्या. यामुळे त्यांच्या पायाला आणि कमरेला दुखापत झाली. ममतांनी हा आपल्यावरील हल्ला असल्याचा आरोप केला आहे, तर भाजपाने याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. सध्या कोलकात्याच्या एसएसकेएम रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा : ममतांवरील हल्ल्यात 'निक्करवाल्यांचा' हात; मदन मित्रांचा संघावर आरोप