विजयपूर (कर्नाटक) : सिंदगी विधानसभा मतदारसंघातील जनता दलाचे (जेडीएस) उमेदवार शिवानंद पाटील यांचे शुक्रवारी रात्री उशिरा हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. पुढील विधानसभा निवडणुकीसाठी सिंदगी मतदारसंघातून पक्षाचे उमेदवार म्हणून 54 वर्षीय शिवानंद पाटील यांची नुकतीच घोषणा करण्यात आली होती.
अचानक हृदयविकाराचा झटका : शिवानंद पाटील शुक्रवारी सकाळी विजयपूर आणि नागठाणा मतदारसंघात एचडी कुमारस्वामी यांच्यासोबत जेडीएसच्या पंचरत्न यात्रेत सहभागी झाले होते. या कार्यक्रमानंतर पाटील सिंदगीला गेले. तेथे रात्री उशिरा त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर पाटील यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले असता शुक्रवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला.
कुमारस्वामी यांचे ट्विट : कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी ट्विट करून पाटील यांच्या आकस्मिक निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. ' जेडीएसचे सिंदगी विधानसभा मतदार संघाचे उमेदवार शिवानंद पाटील यांच्या अकाली निधनाने मला खूप मोठा धक्का बसला आहे. शिवानंद पाटील यांच्या निधनाने मी वैयक्तिकरित्या दु:खी झालो आहे. त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो आणि कुटुंबियांना दु:ख सहन करण्याची ताकद मिळो', असे एचडी कुमारस्वामी यांनी ट्विट केले आहे. कुमारस्वामी पुढे म्हणाले, 'लष्करातील निःस्वार्थ सेवेनंतर निवृत्त झालेल्या पाटील यांना समाजसेवेची अदम्य इच्छा होती. त्यांच्याकडे उत्कृष्ट संघटनात्मक कौशल्ये आणि गतिशीलता होती. त्यांच्याशी ओळखीनंतर अल्पावधीतच ते मला खूप प्रिय झाले'.
जेडीएसचे ट्विट : जनता दल युनायटेड पक्षाने देखील पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत ट्विट केले आहे. पक्षाने ट्विट केले की, 'सिंदगी विधानसभा मतदारसंघातील जेडीएसचे उमेदवार शिवानंद पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने अकाली निधन झाल्याची बातमी कळताच अतिशय दु:ख झाले. या प्रसंगी त्यांच्या कुटुंबियांना बळ मिळो अशी आम्ही प्रार्थना करतो. दिवंगत आत्म्याला शांती लाभो हीच प्रार्थना. शिवानंद यांच्या पश्चात त्यांना पत्नी, मुलगा व मुलगी असा परिवार आहे.
भाजपमधून जेडीएसमध्ये दाखल : शिवानंद पाटील विजयपूर जिल्ह्यातील अलामेला तालुक्यातील सोमाजाला गावचे आहेत. ते लष्करात सोळा वर्षे सेवा बजावून निवृत्त झाले असून त्यांनी अलीकडच्या काळातच राजकारणात प्रवेश केला होता. त्यांनी या आधी हुबळी येथे सुरक्षा एजन्सीही चालवली होती. मूळचे भाजपचे सदस्य असलेले पाटील यांनी नुकताच जेडीएस पक्षात प्रवेश केला होता. जेडीएसने त्यांना विजयपूर जिल्ह्यातील सिंदगी मतदारसंघातून आगामी निवडणूक लढवण्यासाठी तिकीट जाहीर केले होते.