चेन्नई ISRO Chief Autobiography : आत्मचरित्र प्रकाशित होण्यापूर्वीच त्यावरून निर्माण झालेल्या वादांमुळे अस्वस्थ झालेले इस्रो अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी त्यांच्या पुस्तकाचं प्रकाशन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. 'पुस्तक अजून प्रकाशित झालेले नाही. मात्र मला वाटतं की पुस्तकाच्या काही प्रती प्रेसनं पाहिल्या आहेत. विनाकारण वाद निर्माण झाल्यानं मी पुस्तकाचं प्रकाशन थांबवत आहे. तरुणांना संघर्षावर मात करण्यासाठी प्रेरित करणं हा या पुस्तकाचा उद्देश आहे', असं सोमनाथ यांनी स्पष्ट केलं.
प्रकाशन थांबवलं : ते पुढे म्हणाले की, 'प्रसारमाध्यमांनी ठळकपणे प्रकाशित केलेले उतारे पुस्तकाचा एक छोटासा भाग आहेत'. एका वृत्ताचा संदर्भ देत सोमनाथ म्हणाले की, 'शिखरावर पोहोचताना येणाऱ्या आव्हानांना मी हायलाइट करण्याचा प्रयत्न करत होतो. याचा अर्थ असा नाही की डॉ. के. सिवन (माजी इस्रो प्रमुख) यांनी मला थांबवलं किंवा अडवलं. लेखाच्या व्याख्येशी मी असहमत आहे.' आत्मचरित्रातील ज्या भागांमुळे वाद निर्माण झाला होता त्यात सुधारणा करणार का?, असं विचारलं असता सोमनाथ म्हणाले की, 'सध्या मी ते प्रकाशित करत नाही.'
काय आहे प्रकरण : असं बोललं जात आहे की, सोमनाथ यांनी त्यांचं आत्मचरित्र 'निलावू कुडीचा सिंहगल' (द लायन दॅट ड्रँक द मून) मध्ये म्हटलंय की, इस्रोचे अध्यक्ष झाल्यानंतर डॉ. के. सिवन यांनी त्यांची विक्रम साराभाई स्पेस सेंटरचे संचालक म्हणून पदोन्नती करण्यास विलंब केला होता. सोमनाथ यांच्या मते, व्हीएसएससीचे माजी संचालक बी. एन. सुरेश यांच्या मध्यस्थीनंतरच त्यांची बढती झाली. वृत्तानुसार, सोमनाथ यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटलं आहे की, त्यांना (सोमनाथ) इस्रोचे अध्यक्ष होण्यापासून रोखण्यासाठी यू.आर. राव स्पेस सेंटरच्या संचालकांना स्पेस कमिशनचं सदस्य करण्यात आलं.
हेही वाचा :