नवी दिल्ली - राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज (शुक्रवार) अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी अभिभाषण दिले. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये दोन्ही सभागृहाच्या सदस्यांसमोर त्यांनी सरकारच्या कामांची माहिती दिली. यावेळी राष्ट्रपतींनी प्रजासत्ताक दिनी झालेल्या लाल किल्ल्यावरील हिंसाचाराचा उल्लेख केला. प्रजासत्ताक दिनी तिरंग्याचा अपमान ही दुर्देवी घटना असल्याचे कोविंद म्हणाले.
शेतकऱ्यांचे जुने अधिकार हिरावले जाणार नाहीत
लहान शेतकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. नव्या कृषी कायद्यांमुळे १० कोटी लहान शेतकऱ्यांना फायदा मिळणे सुरू झाला आहे. ज्या शेती सुधारणांवर अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होती. त्यानुसार कायदे पास करण्यात आले. शेती कायद्यांबाबत निर्माण केलेल्या संभ्रमांना दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. नव्या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे जुने अधिकार हिरावले जाणार नाहीत. उलट आणखी नवे अधिकार दिले आहेत.
लाल किल्ल्यावर आंदोलकांचा कब्जा -
केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात प्रजासत्ताक दिनी शेतकऱ्यांनी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली होती. मात्र, या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागले होते. काही आंदोलकांनी लाल किल्ल्यावर ताबा मिळवला तसेच तेथे निशाण साहिबचा ध्वज फडकावला. यावेळी पोलीस आणि आंदोलकांत झटापट झाली. हल्ल्यातून बचाव करण्यासाठी पोलिसांनी संरक्षण भींतीवरून खाली उड्या मारल्या. यात अनेकजण जखमीही झाले. शेतकरी ट्रॅक्टर घेवून लाल किल्ल्याच्या आवारात शिरले होते.