पाटणा - विज्ञानाने बरीच प्रगती केली आहे. परंतु जर तुम्ही आजही खेड्यात गेलात, तर तुम्हाला अंधविश्वासाच्या गोष्टी आढळतील. आजच्या आधुनिक विज्ञानाच्या युगातही ग्रामीण भागातील समाज हा अजूनही अंधश्रद्धेच्या चिखलात रुतलेला आहे. असाच काहीसा प्रकार बेगूसरायमध्ये पाहायला मिळाला आहे. अंधश्रद्धेचा अघोरी खेळामुळे एका युवकाचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांनी तरूणाला मृत घोषित केले. पण तांत्रिक त्याला जिवंत करून दाखवण्याचा दावा करत होता. ही घटना सहाय्यक पोलीस स्टेशन परिसरातील जगदीशपूर गावची आहे.
जगदीशपूरच्या गंगासागरचा मुलगा राजा कुमार (22 वर्षे) हा गावच्या बहियार येथे घोडी आणण्यासाठी गेला होता. परत आल्यावर त्याने जनावरांना चारासुद्धा दिला. मात्र, अचानक त्यांची तब्येत बिघडली. यावेळी गावातील काही लोकांनी त्याला सर्पदंश झाला असावा, असा अंदाज वर्तवला. त्यानंतर रुग्णालयात नेण्याऐवजी गावातीलच फिरो स्थान मंदिरात त्याला नेण्यात आले. तांत्रिकाने तंत्र-मंत्रांच्या सहाय्याने त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तंत्र-मंत्रांने काहीच फरक पडत नसून तब्येत आणखी बिघडल्याचे दिसल्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेव्हा डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
डॉक्टरांनी राजाकुमारला मृत घोषित केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांनी तंत्र-मंत्रांच्या सहाय्याने त्याला जिवंत करण्याचा प्रयत्न केला. तांत्रिक सांगेल, तसे कुटुंबीयांना केले. अंधश्रद्धेची कळस मर्यादा तर तेव्हा ओलांडली, जेव्हा मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याऐवजी तो केळीच्या घडाला बांधून तो नदीच्या काठी सोडला. काही चमत्कार होईल आणि तरुण जिवंत होईल, अशी आशा त्यांना होती. सध्या ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. अंधश्रद्धेला बळी न पडता तरूणाला रुग्णालयात नेण्यात आले असते, तर त्याचा जीव वाचला असता, असे गावकरी म्हणत आहेत.
सर्पदंश झाल्यास प्रथमोपचार कसा कराल
- दंश झालेल्या व्यक्तीला मांत्रिकाकडे न नेता तत्काळ दावाखान्यात न्यावे.
- वाहन, व्हीलचेअर किंवा स्ट्रेचरच्या मदतीने पीडिताला आरोग्य केंद्रात न्यावे.
- पीडिताला जास्त चालू देऊ नका.
- पीडिताला झोपू देऊ नका, कारण, झोपेवेळी रक्त प्रवाह वेगाने वाढतो
- सर्पदंशावर प्रतिसर्प विष हे एकमेव औषध आहे.