वाराणसी - धर्म आणि अध्यात्माची नगरी असलेल्या बनारसमध्ये ३३ प्रकारच्या देवतांचे वास्तव्य असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे, वाराणसीमध्ये भाविकांची नेहमीच गर्दी असते. शांती मिळण्यासाठी आणि इश्वाराचा साक्षात्कार होण्याची आस बाळगून भक्त येथे येत असतात. मंदिरांमुळे प्रसिद्ध असलेले हे शहर जगभरातील पर्यटकांचे लक्ष वेधते. आपली इच्छा घेऊन देवाकडे जाऊन ती पूर्ण व्हावी यासाठीही लोक तिथे येतात. प्रभुचरणी मनोभावे मनातून इच्छा व्यक्त केली जाते. मात्र, येथील एका अनोख्या मंदिरात नवस पूर्ण करण्यासाठी भाविक कुलूप लावतात. बंदी माता मंदिर ( Bandi mata temple Varansi ) असे या मंदिराचे नाव आहे. ते गंगेच्या घाटावर वसलेले आहे.
या मंदिरात भाविक न्यायालयीन खटले आणि अनावश्यक खटल्यातून सुटका होण्यासाठी बंदी मातेची ४१ दिवस पूजाविधी करतात व द्वाराला कुलूप लावतात. गंगेच्या काठावर वसलेल्या या मंदिराच्या मुख्य दरवाजाला हजारो कुलूप लागलेले आहेत.
अहिरावणाचा वध करून श्रीरामाला मुक्त केले : बंदी मातेचे प्राचीन मंदिर काशीखंड येथील पंचकोशी यात्रेअंतर्गत येते. येथील मुख्य पुजारी सुधाकर दुबे सांगतात की, बंदी मातेची पातालची देवी म्हणून पूजा केली जाते. भगवान राम आणि लक्ष्मणाला अहिरावणाने पाताललोकात नेले तेव्हा त्यांना तो आपल्या इष्ट देवीला अर्पण करण्यासाठी तयार करत होता, त्यावेळी प्रभू रामाने बंदी मातेला विनंती केली की, तुझ्यासमोर देवांना अर्पण केले जाणार आहे. आमची रक्षा कर आणि आम्हाला या बंधनातून मुक्त कर, तेव्हा मातेने हनुमानाला त्यांची मदत करण्यासाठी पाठवले. यानंतर त्यांनी श्रीराम आणि लक्ष्मण यांना बंधनातून मुक्त केले आणि अहिरावणाचा वध केला. त्यामुळेच, मातेला बंधनातून मुक्त करणारी देवी म्हणून ओळखले जाते.
जेव्हा भगवान शंकर काशीची स्थापना करत होते, तेव्हा वेगवेगळ्या देवतांना येथे स्थायिक होण्यासाठी आमंत्रित केले जात होते. तेव्हा बंदी मातेला आग्रह करून येथे स्थापित करण्यात आले. तेव्हापासून मातेचे हे प्राचीन मंदिर येथे आहे आणि लोकांना बंधनातून मुक्त होण्याचा आशीर्वाद देत आहे, अशी माहिती देखील सुधाकर दुबे यांनी सांगितली.
मुख्य द्वाराला हजारो कुलूप : मुख्य पुजाऱ्याने सांगितले की, मंदिराच्या मुख्य द्वाराला लावलेले हजारो कुलूप हे हजारो लोकांच्या श्रद्धेचे प्रतीक आहे जे बंदी मातेला आपली कुलदेवी मानतात. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड येथून मोठ्या संख्येने लोक येथे येतात. आता परदेशातील नागरिकही मोठ्या संख्येने येथे येत आहेत. या मंदिरात लोक न्यायालयीन प्रकरणे आणि अनावश्यक खटल्यातून सुटका मिळवण्यासाठी 41 दिवस धार्मिक विधी करत असल्याची माहिती पुजाऱ्याने दिली.
मनोकामना पूर्ण झाल्यानंतर भाविक कुलूप उघडतात : असे मानले जाते की, या ठिकाणी 41 दिवस नियमित येऊन दर्शन घेतल्यास मनोकामना पूर्ण होते. येथे लोक कुलूप लावून ही विधी पूर्ण करतात. कुलूप लावल्यानंतर भाविक येथे पूजा करतात आणि नवस करतात. नवस पूर्ण झाल्यानंतर लोक येथे येतात, कुलूप उघडतात आणि त्यास चावीसह गंगेत प्रवाहित करून मातेचे श्रुंगार आणि भोग करवून घेतात. याच कारणामुळे अनादी काळापासून काशीतील बंदिमाता मंदिराला कुलूपांची देवी म्हणूनही ओळखले जाते. आमच्या मनोकामना इथे पूर्ण होतात. मातेवरील श्रद्धा अतूट असल्याचे येथे येणाऱ्या भाविकाने सांगितले.