श्रीनगर - पाकिस्तान हा दहशतवाद्यांचा कारखाना बनला आहे. पाकिस्तानात दहशतवादी संघटना फोफावत आहेत. दहशतवादी नेहमीच छुप्या मार्गाने काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करतात. आता पुन्हा गुरवारी भारतीय लष्काराच्या जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न उधळून लावला. दहशतवादी पुंछ सेक्टरमध्ये नियत्रंण रेषेजवळ भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. भारतीय सैन्यांकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
संरक्षण पीआरओने दिलेल्या माहितीनुसार, जवानांनी गुरवारी रात्री पुंछ सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ घुसखोरांची हालचाल पाहिली. यानंतर ताबडतोप जवानांनी गोळीबार करत भारतात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना रोखलं. अशीच एक घटना पंजबामध्ये घडली आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सीमेवरून घुसखोरी करताना तीन पाकिस्तानी अमली पदार्थ तस्करांना बुधवारी रात्री रोखले. सीमेवर संशयास्पद हालचाल सुरू होताच सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी तस्करांच्या दिशेने गोळीबार केला. यावेळी एका तस्कराला अटक करण्यात यश आले आले. त्याच्याकडून अमली पदार्थांचे दोन पॅकेट जप्त करण्यात आले आहेत.
लष्कराकडून डोळ्यात तेल घालून निगराणी -
पाकमधून कायम रात्रीच्या वेळी दुर्गम भागातून भारतीय सीमेत घुसखोरी होते. दहशतवादी जमिनीखाली भुयार खोदून भारतीय सीमेत घुसखोरी करतात. पाकव्याप्त काश्मीर भागात सुमारे 200 ते 250 दहशतवादी तळ कार्यरत असून येथील दहशतवादी भारतात प्रवेश करण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली होती. मात्र, सीमेवरील दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी लष्कराकडून डोळ्यात तेल घालून निगराणी करण्यात येते.
हेही वाचा - जम्मू काश्मीर : फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे निधन