श्रीहरिकोटा - इस्रोने या वर्षीच्या आपल्या अंतराळ मोहिमेस सुरुवात केली आहे. इस्रोने PSLV-C52/EOS-04चे प्रक्षेपण केले. आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून इस्रोने हे प्रक्षेपण केले. इस्त्रोने PSLV-C52 मिशन अंतर्गत 3 सॅटलाईट लाँच करण्यात आले. पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-04 सोबत PSLV-C52 रॉकेटमधून दोन छोटे उपग्रह यशस्वीपणे प्रक्षेपित करण्यात आले
यातील एक EOS-04 रडार इमेजिंग आहे. याचा फायदा कृषी, वने, हवामान, भूविज्ञान आणि जलविज्ञान या क्षेत्रात तसेच किनारी भागातील सुरक्षा मजबुत करण्यासाठीही होणार आहे. या सॅटलाईट लाँच केल्याने इस्त्रोच्या योजनांना गती मिळणार आहे. तसेच चांद्रयान-3 आणि गगनयानसह 19 सॅटलाईट लाँच करणे हे इस्त्रोचे लक्ष्य आहे.
इस्रो या वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यांत पाच उपग्रह लाँच करण्याच्या तयारीत आहे. पहिला EOS-4 असेल. यानंतर मार्चमध्ये OCEANSAT-3 आणि INS-2B PSLV-C53 वर प्रक्षेपित केले जातील. PSLV-C53 वर OCEANSAT-3 आणि INS-2B मार्चमध्ये लाँच करण्यात येईल. तर एप्रिलमध्ये SSLV-D1 मायक्रोसॅट लाँच होईल. कोणत्याही उपग्रह प्रक्षेपणाची निश्चित तारीख शेवटच्या क्षणापर्यंत बदलली जाऊ शकते. कारण कोणत्याही लाँचपूर्वी अनेक प्रकारचे परिमाणे पहावे लागतात.
13 हजार 700 कोटींचे अंतराळ बजेट -
केंद्रीय अर्थसंकल्प 2022 मध्ये (Union Budget 2022) यावेळी केंद्र सरकारने इस्रोच्या (ISRO) बजेटमध्येही वाढ केली आहे, ज्यामुळे गेल्या दोन वर्षांत कोविड-19 महामारीमुळे पुढे ढकलण्यात आलेल्या मोहिमांना गती मिळण्याची अपेक्षा आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाला 14217.46 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यापूर्वीच्या 2021-22 या आर्थिक वर्षापेक्षा 833 कोटी रुपये जास्त आहेत, ज्यामध्ये 13,438 कोटी रुपये वाटप करण्यात आले होते. यावर्षी सरकारने एस सोमनाथ यांच्या नेतृत्वाखालील इस्रोला 13,700 कोटींचे वाटप केले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत हजार कोटींनी जास्त आहे. अंतराळ विभागाला मिळालेला भरीव निधीमुळे कोविड-19 मुळे मंद गतीने चाललेल्या मोहिमा गती मिळेल.
हेही वाचा - इस्रोच्या साऊंडींग रॉकेट RH-60 चे यशस्वी प्रक्षेपण