हैदराबाद - दोन दिवसांपूर्वी रिलायन्स उद्योग समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी महाराष्ट्राला मोफत ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. त्यापाठोपाठ आता देशातील अनेक पोलाद उद्योजक महाराष्ट्राच्या मदतीला धावले आहेत. टाटा स्टील, जिंदाल स्टील, निप्पोन स्टील आणि सेल स्टील यांनी देखील विविध ठिकाणी कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी ऑक्सिजन देण्याची तयारी दर्शवली आहे.
टाटा देणार २०० ते ३०० टन लिक्विड ऑक्सिजन -
देशात कोविडची दुसरी लाट आली असून मोठ्या प्रमाणात त्याचा प्रसार झाला आहे. वाढत्या रूग्णसंख्येसह वाढणारा मृत्यूदर आरोग्य विभागासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. देशात अनेक ठिकाणी रेमडेसीवीर आणि ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामध्ये महाराष्ट्राची सर्वात वाईट स्थिती आहे. अशा काळात मदत म्हणून टाटा उद्योग समुहाने महाराष्ट्रासह विविध राज्यांना वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजन देण्याचा निर्णय घेतला आहे. रविवारी एक अधिकृत ट्विट करून टाटा उद्योग समुहाने दिवसाला २०० ते ३०० टन लिक्विड ऑक्सिजन देण्याची घोषणा केली आहे.
जिंदाल स्टील धावले रूग्णांच्या सेवेसाठी -
महाराष्ट्रातील कोरोनाचा कहर पाहता जिंदाल स्टील समुहाचे प्रमुख सज्जन जिंदाल यांनी राज्याला ऑक्सिजन पुरवठा सुरू केला आहे. राज्यातील डोलवी येथील प्लँटमधून दररोज १८५ टन ऑक्सिजन दिला जात आहे. जिंदाल समुहाने याबाबत एक ट्विट केले आहे. पोलाद उद्योगात ऑक्सिजन हा महत्त्वाचा कच्चा माल आहे. मात्र, सध्या उद्योगापेक्षा आरोग्य क्षेत्राला त्याची जास्त आवश्यकता आहे. आमच्या लेखी उद्योगापेक्षा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे. त्यामुळे वैद्यकीय वापरासाठी ऑक्सिजन देण्यास जिंदाल समुह कटिबद्ध आहे, असे या ट्विटमध्ये म्हटले आहे. महाराष्ट्राशिवाय छत्तीसगड आणि ओडिशामध्ये देखील जिंदाल समुह ऑक्सिजन पुरवठा करणार आहे.
अर्सेलर मित्तल निप्पोन समुह नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध -
अर्सेलर मित्तल निप्पोन समुहाने १७ एप्रिलला २०० मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन देण्याची घोषणा केली आहे. गुजरातमधील कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी हा ऑक्सिजन वापरला जाणार आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप ओमेन यांनी ट्विटकरून याबाबत माहिती दिली. हजारीया येथील ऑक्सिजन प्लँटमधून हा ऑक्सिजन दिला जाणार आहे. कोरोना महामारी सुरू झाल्यापासून अर्सेलर मित्तल निप्पोन समुहाने आतापर्यंत १ लाख ३० हजार टन ऑक्सिजन वैद्यकीय कारणांसाठी दिला आहे, अशी माहिती पोलाद उद्योग मंत्रालयाने दिली आहे.
'सेल'ने केले ३३ हजार ३०० टन ऑक्सिजनचे वाटप -
स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड(सेल)ने आतापर्यंत केले ३३ हजार ३०० टन ऑक्सिजनचे वाटप केले आहे. बोकारो, भिलाई, रुरकेला, दुर्गापूर आणि बुरनपूर याठिकाणच्या प्लँटमधून सेलने कोरोनाबाधितांच्या उपचारांसाठी ऑक्सिजनचा पुरवठा केला आहे.
अंबानींची महाराष्ट्राला मोठी मदत -
सध्या देशातील सर्वात जास्त कोरोना रूग्णसंख्या महाराष्ट्रामध्ये आहे. औषधे, बेड आणि ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला असून रूग्णांचे हाल होत आहेत. आरोग्य यंत्रणा पूर्णपणे हतबल झाली आहे. अशा परिस्थितीमध्ये रिलायन्स उद्योग समुह राज्य शासनाच्या मदतीला धाऊन आला आहे. त्यांनी ३० हजार टन ऑक्सिजन मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातच्या जामनगर येथील प्लँटमधून हा पुरवठा महाराष्ट्राला केला जाणार आहे.
हेही वाचा - कोरोना मृतांच्या सरकारी आकडेवारीवर प्रश्नचिन्ह का? वाचा भयावह वास्तव...(भाग-2)