नवी दिल्ली : गुरुवारी यावर्षातील इस्रोची शेवटची अंतराळ मोहीम यशस्वीपणे पार पडली. देशाचा अत्याधुनिक कम्युनिकेशन सॅटेलाईट सीएमएस-०१ काल सायंकाळी अंतराळात दाखल झाला. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे यंदाच्या वर्षी इस्रोच्या अनेक मोहिमा पुढे ढकलाव्या लागल्या. त्यामुळे ही मोहीम यावर्षीची दुसरी आणि शेवटची मोहीम ठरली.
'पीएसएलव्ही सी-५०'चा वापर..
अंतराळात उपग्रह पाठवायच्या असल्यास भारताचे सर्वात विश्वासू यान म्हणजे पोलार सॅटेलाईट लाँच व्हेईकल (पीएसएलव्ही). या यानाने याहीवेळी आपली क्षमता सिद्ध करत, लॉंचनंतर अवघ्या २० मिनिटांमध्ये हा उपग्रह आपल्या कक्षेत नेऊन सोडला. आंध्रप्रदेशच्या श्रीहरीकोटा अंतराळ केंद्रावरुन या पीएसएलव्ही सी-५०चे प्रक्षेपण करण्यात आले. पीएसएलव्हीच्या 'एक्सएल' प्रकारातील ही २२वे उड्डाण होते. तर, श्रीहरीकोटाहून प्रक्षेपित होणारे हे ७७वे अंतराळयान होते.
४२वा कम्युनिकेशन सॅटेलाईट..
सीएमएस-०१ हा भारताचा ४२वा संज्ञापन उपग्रह आहे. या उपग्रहाच्या मदतीने भारतासह अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप या बेटांवरही फ्रीक्वेन्सी स्पेक्ट्रमच्या एक्सटेंडेड सी बँडची सुविधा पुरवता येणार आहे. या उपग्रहाचा कार्यकाळ सात वर्षांचा असणार आहे, अशी माहिती इस्रोने दिली.
यापूर्वी वर्षातील पहिल्या अंतराळ मोहिमेमध्ये इस्रोने पीएसएलव्ही सी-४९ या अंतराळयानासोबत सोबत 'ईओएस-01′ (अर्थ ऑब्जर्वेशन सॅटेलाइट) एक प्राथमिक उपग्रह आणि नऊ इतर व्यावसायिक उपग्रहांचे प्रक्षेपण केले होते.
हेही वाचा : काश्मिरातील दल लेकमध्ये सुरू होतेय 'बोट अॅम्ब्युलन्स' सेवा