नवी दिल्ली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लडाखमधील भारत चीन सीमावादाबाबत संसदेत आज मोठी घोषणा केली. राज्यसभेत बोलताना त्यांनी सांगितले की, सीमेवरील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांचे सैन्य हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. टप्प्याटप्याने दोन्ही देशांचे सैन्य पूर्वी ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी माघारी घेण्यास सुरुवात झाली आहे. चीनसोबत इतर मुद्द्यांवर लष्करी, राजनैतिक स्तरावरील चर्चा सुरूच राहील. सीमेवर जैसे थे स्थिती लवकरच येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
रक्तरंजित वादानंतर निघाला तोडगा -
मागील एक वर्षापासून भारत चीन सीमेवर तणाव सुरू होता. गलवान खोरे, पँगाँग सरोवर भागात दोन्ही देशाचे सैन्य आमनेसामने उभे होते. मात्र, आता सैन्य माघारी जाण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सीमेवर एप्रिल २०२० नंतर जे काही बांधकाम दोन्ही देशांनी केले असेल ते सर्व काढून टाकण्यात येईल आणि जैसे थे स्थिती आणली जाईल. पूर्वीप्रमाणे चीन त्यांचे सैन्य फिंगर ८ (गस्त पाँईन्ट) पर्यंत मागे घेईल तर भारतीय सैन्य फिंगर ३ जवळ थांबेल. जे काही मुद्दे सीमावादात राहीले आहेत, त्यांच्यावरही चर्चा सुरू आहे. लवकरच त्यावरही तोडगा काढला जाईल, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले. संपूर्ण देश आणि संसदेने सैन्याच्या शौर्याचे कौतुक करावे. देशाची एकता, सार्वभौमत्वासाठी सगळा देश एक असल्याचा संदेश जगात जायला हवा. असे सिंह म्हणाले.
चर्चेने दोन्ही देशातील संबंध सुधारतील
द्विपक्षीय संबध दोन्ही देशातील चर्चेने आणि प्रयत्नानेच पुढे जातील. सीमेवर शांतता आणि सौदार्ह कायम ठेवणे गरजेचे आहे. मात्र, चीनच्या कारवाईमुळे शांतता भंग झाली आहे. सीमावादावर चीनसोबत अनेक उच्चस्तरीय चर्चा झाल्या. सैन्य मागे घेतल्याने सीमेवर शांतता निर्माण होईल, हे चीनला स्पष्टपणे सांगितले आहे. चीनचा सामना करण्यासाठी अतिरिक्त सैन्य तैनात केले होते. भारतीय सैन्याने वीरतेने चीनचा सामना केला, असेही राजनाथ सिंह संसदेत म्हणाले.
तीन मुद्द्यांवर भारताने दिला भर -
अत्यंत खडतर परिस्थितीत आपली सैन्य सीमांचे रक्षण करत आहेत. चीनसोबतच्या चर्चेत तीन मुद्द्यांवर भर देण्यात आला. प्रत्यक्ष सीमा रेषेला (एलएसीला) मान्य करावे, एकतर्फी सीमेवर बदल नको. दोन्ही देशातील करारांचे पालन करावे, या तीन मुद्द्यांवर चीनसोबतच्या चर्चेत भर देण्यात आला. दोन्ही देशांचे सैन्य माघारी आपल्या तळावर जावे, यावर चर्चा झाली. भारताची एक इंचही जमीन शत्रूला देणार नाही, असे संरक्षण मंत्र्यांनी संसदेत ठामपणे सांगितले. लष्करी स्तरावर चर्चेच्या नऊ फेऱ्या झाल्या आहेत. पँगाँग सरोवराच्या दक्षिण आणि उत्तरेकडून सैन्य माघारी घेण्यावर एकमत झाले आहे. चीनसोबत झालेल्या चर्चेत टप्प्याटप्याने सैन्य माघारी घेण्यावर एकमत झाले आहे. जैसे थे स्थिती पुन्हा सीमेवर आणण्यात येईल. आणखी काही मुद्दे राहिले आहेत, त्यावरही चर्चा लवकरच होईल, असे राजनाथ सिंह म्हणाले.