भिंड (मध्य प्रदेश) - येथील गोरमी भागात अनेक जण बंदूक घेऊन एकत्र जमल्याची घटना उघडकीस आली आहे. या व्हिडिओत कुख्यात डाकू राम बाबू गडरियाच्या नावाचे नारे देखील लोक लावत आहे. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. एकीकडे चंबलची ओळख बदलावी यासाठी प्रशानाकडून प्रयत्न सुरू आहेत, तर दुसरीकडे असे प्रकार समोर येत आहेत. भिंडचे पोलीस अधीक्षक या भागातील लोकांनी हिंसा आणि वाईट कामे सोडून चांगले जीवन जगावे, यासाठी प्रयत्न करत आहेत. मात्र, या भागातील लोक निश्चिंत होत उघडल्यावर बंदुका घेऊन एकत्र जमत आहेत.
कर्फ्यू असूनही बंदुकांसह बर्थडे पार्टी -
मिळालेल्या माहितीनुसार, गोरमी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कचनाव गावातील राम लक्ष्मण बघेल यांच्या घरी बुधवारी मुलाचा वाढदिवस होता. कोरोनामुळे कर्फ्यू लावण्यात आला आहे, त्यामुळे लोकांना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, तरीही इथे मोठ्या प्रमाणात लोकांना आमंत्रित केलं होतं. ग्वाल्हेरहून गिर्राज पहेलवान नावाच्या युवकाला बोलवण्यात आलं होतं. तो त्याच्यासोबत स्थानिक कलाकारांना घेऊन इथे आला होता.
बंदुकांसह बीहडमध्ये शुटींगला गेल्याची माहिती -
इथे केवळ कोरोनाच्या नियमांचाच फज्जा उडाला नाही, तर वाढदिवसानिमित्त या कलाकारांनी बुंदेली, बृजभाषेतील लोकगीते गायली. त्यानंतर फिल्मी स्टाईलमध्ये बंदुकांसह शुटींग करण्यासाठी क्वारी नदीवर गेले. तिथे जाण्यापूर्वी ग्रामस्थांना एकत्र केलं. त्यानंतर संपूर्ण गावातील लोक बंदुकांसह बाहेर पडले आणि रस्त्यांसह छतांवर जमले.
पोलिसांकडून गुन्हा दाखल -
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी हजर झाले. पोलीस पोहोचले तेव्हा तिथे मोठी गर्दी होती, असे अतिरिक्त अधिक्षक कमलेश कुमार यांनी सांगितलं. मात्र, पोलिसांना बघून गर्दी सैरावैरा पळाली. कोरोनाचे नियम मोडल्याप्रकरणी रामलक्ष्मण बघेल आणि गिर्राज पहेलवानविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.